म्हणून अशोक सराफ या गाण्यात नाचताना ताठ उभे होते….सगळीकडे बोंबाबोंब चित्रपटाच्या गाजलेल्या गाण्याचा किस्सा
मराठी सृष्टीत अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर यांनी एकत्रित खुप चित्रपटातून काम केलं. कधी नायिका म्हणून तर कधी सहकलाकार म्हणून या दोघांनी काही चित्रपट केले. त्यातला एक चित्रपट म्हणजे १९८९ सालचा ‘सगळीकडे बोंबाबोंब’ . या चित्रपटात वर्षा उसगावकर अशोक सराफ यांची नायिका होती. या चित्रपटातलं ना सांगताच आज हे कळे मला… आणि मला परीचे पंख मिळाले…ही गाणी खूपच गाजली होती. त्यातलं ना सांगताच आज हे या गाण्यात दोघांना एकत्रित काम करायचं होतं. पण अशोक सराफ या गाण्यात ताठ नाचताना दिसत होते.
एरवी कुठल्याही गाण्यात अशोक सराफ थोडीतरी कंबर हलवताना दिसतात मात्र या गाण्यात ते जराही वाकलेले तुम्हाला दिसले नसतील. यामागे एक खास कारण दडलेलं होतं. या चित्रपटाची ही आठवण सांगताना वर्षा उसगावकर म्हणतात की, “ना सांगताच आज हे कळे मला हे गाणं अशोक आणि माझ्यावर चित्रित झालेलं गाजलेलं गाणं आहे. आजही ते तेवढंच सुपरहिट गाणं आहे. या गाण्यात अशोक ताठ वाटतो…त्याचं कारण म्हणजे गाण्याच्या शूटिंग अगोदर नुकताच तो एका गंभीर अपघातातून बाहेर आला होता. तो खरं तर चमत्कारच होता. अपघातानंतर त्याचं ते पहिलंच गाणं शूट झालं होतं. “
वर्षा उसगावकर आणि अशोक सराफ यांची ही त्यावेळी झालेली मैत्री आजही तशीच अबाधित पाहायला मिळते. त्याकाळी कलाकारांमध्ये एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती होती. वर्षा उसगावकर त्या दरम्यान नव्या दमाच्या नायिका म्हणून काम करत होत्या. पण एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांमुळे त्या सुपरस्टार बनल्या. सचिन पिळगावकर वर्षा उसगावकर यांची सेटवर अनेकदा चेष्टा मस्करी करत असत. त्याचमुळे या कलाकारांचे चित्रपट आपलेसे वाटत.