निवेदिता सराफ या उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्या आभिनयासोबतच उत्तम स्वयंपाक देखील करतात हे त्यांच्या सहकलाकारांना चांगलेच ठाऊक आहे. निवेदिता सराफ हंसगामीनी हा साड्यांचा ब्रँड चालवतात त्यामुळे एक व्यावसायिक म्हणून त्यांनी वेगळ्या क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. यासोबतच त्यांचा युट्युबवर स्वतःच्या नावाने एक चॅनल आहे. यावर त्यांनी बनवलेल्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडीओ शेअर करतात. पदार्थ बनवताना काही खास टिप्स सुद्धा त्या या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतात. त्यामुळे अनेक शिकावू गृहिणींना , मुलींना त्यांनी बनवलेले पदार्थ शिकता येतात. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की निवेदिता सराफ यांना लग्नानंतरही अजिबात स्वयंपाक करायला येत नव्हता. हे अगदी खरं आहे. कारण मटकीला मोड कसे आणतात? हे त्यांनी लग्नानंतर आपल्या आईला फोनवरून विचारले होते.

एवढेच नाही तर निवेदिता जोशी आणि अशोक सराफ ह्यांचे आणखी काही भन्नाट किस्से या सदरातून जाणून घेऊयात… अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांचा प्रेमविवाह होता. मात्र निवेदिता यांच्या घरच्यांना हे लग्न मुळीच मान्य नव्हते. त्याच कारण देखील तसंच होत घरच्यांनी “अभिनय क्षेत्रातला मुलगा नको” असे त्यांनी निवेदिताला अगोदरच स्पष्ट केले होते. मात्र म्हणतात ना की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळतात, अगदी तसेच निवेदिता आणि अशोकच्या बाबतीत घडले. या दोघांचे लग्न होऊ नये म्हणून निवेदिता यांचे घरचे खूप प्रयत्न करत होते. एके दिवशी अशोक सराफ यांच्यासाठी निवेदिताने पहिल्यांदा पोहे बनवले होते. निवेदिताच्या आई विमल जोशी या आकाशवाणीमध्ये कार्यरत होत्या. कामावरून घरी आल्यावर निवेदिता यांची बहीण मिनलने हा सर्वप्रकार आईला सांगितला आणि म्हणाल्या “आई तू अजिबात काळजी करू नकोस आता अशोक सराफ निवेदिता सोबत लग्न करणं अजिबात शक्य नाही , कारण तिने इतके भयंकर पोहे बनवले होते की, ते खाल्ल्यानंतर कुठलाही माणूस तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही.” मात्र काही दिवसानंतर या दोघांचे अगदी साध्या पद्धतीने गोव्यातील मंगेशी मंदिरात लग्न पार पडले. लग्नानंतरही निवेदिता यांनी स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे नवनवीन पदार्थ बनवणे आणि अशोकजीना खाऊ घालणे याची जबाबदारी त्या पार पाडू लागल्या. दरम्यान मटकीला मोड कसे आणायचे म्हणून त्यांनी चक्क आईलाच फोन लावला? त्यावेळी एवढी साधी गोष्ट कळत नाही म्हणून आईने त्यांचे कान पिळले होते. बरं आता अशोक सराफ यांना मात्र खाण्याची भयंकर आवड होती. त्यामुळे नवनवीन पदार्थ बनवणे निवेदिता यांच्यासाठी एक आव्हानच होते. एके दिवशी निवेदिता यांनी पुरणपोळी बनवण्याचा घाट घातला. अशोक सराफ घरी आल्यावर त्यांनी ताटात ती पोळी वाढली. हे काय आहे ? असे म्हणत अशोक सराफ यांनी त्यांची फिरकी घेतली. पण या उत्तरावर अशोक सराफ यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली होती . ‘अगं मग ते लिही ना खाली पुरणपोळी आहे म्हणून…त्याशिवाय कशी कळणार?’… आजही चाहत्यांना अशोक आणि निवेदितांचे असे भन्नाट किस्से वाचायला आणि ऐकायला खूपच आवडतात.