रविवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा भरणार आहे. या सभेची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या सभेसाठी राज ठाकरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. अहमदनगर येथून औरंगाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील काही गाड्यांना अपघात झाला आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यात केदार शिंदे आणि अंकुश चौधरी हेही सहभागी झालेले आहेत. या किरकोळ अपघातात तीन गाड्या एकमेकांना आदळल्या मात्र यात कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले जाते. ज्या गाडीत केदार शिंदे आणि अंकुश चौधरी बसले होते त्या गाडीच्या बोनेट तुटले असल्याचे सांगितले जाते.

अपघातानंतर मात्र कोणतीच गाडी कुठेही थांबली नाही आणि ते थेट औरंगाबादकडे रवाना होत राहिले. घोडेगाव येथे हा किरकोळ अपघात घडून आला होता . मात्र मीडियामाध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरवण्यात आली. राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते. पुण्यात पोहोचल्यावर त्यांनी आज सकाळीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर राज ठाकरे आपल्या ताफ्यासह औरंगाबादकडे रवाना झाले. दरम्यान त्यांनी वढू तुळापूर येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी अहमदनगर येथे बस स्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्याने दर्शन घेतले. ह्या सर्व अपडेट्स मीडिया माध्यमातून पदोपदी मिळत आहेत. अहमदनगरवरून औरंगाबादला जात असताना घोडेगाव येथे त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांना हा अपघात घडून आला मात्र आपला प्रवास त्यांनी असाच पुढे चालू ठेवला. या ताफ्यात अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांनी सहभाग घेतला होता. काही वेळापूर्वीच राज ठाकरे त्यांच्या ताफ्यासह औरंगाबाद येथे पोहोचले आहेत. औरंगाबाद येथे उद्या होणाऱ्या सभेची तमाम जनतेला मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.