मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही तगडा अभिनय करत आयफा अॅवार्डवर नाव कोरणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या यशाच्या शिखरावर आहे. वेगळ्या भूमिकांच्या नेहमीच शोधात असलेल्या सईच्या वेबसीरीज खूप गाजत आहेत. व्यावसायिक आयुष्यात सईला चाहत्यांचं प्रेम मिळत आहेच पण तिच्या खऱ्या आयुष्यातही प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती आली आहे. काही दिवसांपूर्वीच माझे दौलतराव मला मिळाले अशी पोस्ट करत सईने ती प्रेमात पडल्याची बातमी दिली होती. तर सईच्या आयुष्यातील याच खास व्यक्तीने तिला वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत.

२६ जून रोजी सईने तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला. यंदाच्या वर्षी सईच्या खात्यात सिनेमा आणि वेबसीरीजने चांगलं यश दिलं आहे. समांतर टू पासून सुरू झालेला सईचा प्रवास बेरोजगार आणि मिडियम स्पायसीपर्यंत धावताच आहे. भूमिका छोटी असो किंवा मोठी, सई तिच्या अभिनयाने त्या भूमिकेचं सोनं करते असं तिचे चाहते कायमच म्हणत असतात. शिवाय सोशल मीडियावरही सई तिचे फोटो, व्हिडिओ, रिल्स शेअर करत असते. एकूणच काय तर यंदाचा वाढदिवसही तिच्या आयुष्यात बॉयफ्रेंड अनिश जोगच्या येण्याने खास आहे. अनिश जोगसोबत सई सध्या रिलेशनशीपमध्ये आहे. अनिशसोबतचे फोटो शेअर करून सईनेच ही बातमी दिल्याने तिचे चाहतेही खुश आहेत. सईच्या वाढदिनी अनिशने तिच्यासाठी सोशल मीडियावर एक कॉम्बो व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अनिशने सईचे वेगवेगळे फोटो एकत्र करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अनिशने असं लिहिलं आहे की, सई तू मॅजिक आहेस. हॅपी बर्थ डे मॅजिक. तू हे युध्द जिंकावस अशी माझी इच्छा आहे. अनिशच्या या पोस्टवर सईने लव्ह यू अशी कमेंट केली आहे. यावरून सईने अनिश आणि तिच्या नात्यातील प्रेम जाहीर केलं आहे.

सई ताम्हणकरला यंदा आयफा अॅवार्ड मिळाल्याने ती खूपच आनंदात आहे. मीमी या सिनेमातील भूमिकेसाठी सईने हा पुरस्कार पटकावला. आयफा अॅवार्डमधील तिच्या लुकचीही खूप चर्चा झाली. भाडिपाच्या बेरोजगार या वेबसरीजमध्ये सईने केलेले वऱ्हाडी भाषेतील मुलगीही खूप गाजली. पेट पुराण मालिकेत ललित प्रभाकरसोबत सईची जोडी छान जमली होती, आता पुन्हा ही जोडी मीडियम स्पायसी या सिनेमातही गाजत आहे. पाँडिचेरी या सिनेमातील वेगळ्या भूमिकेसाठीही सईचं खूप कौतुक झालं. एकीकडे अभिनयाची गाडी जोरात धावत असताना अनिश जोगशी लवकरच लग्नाची बातमीही सई देण्यासाठी उत्सुक आहे असं काहीसं चित्र पाहायला मिळणार असल्याचं दिसून येतंय.