अनाथांची माय अशी ओळख मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदय विकाराने निधन झाले आहे. आज ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापूर्वी सिंधुताई सपकाळ यांचे हार्नियाचे ऑपरेशन करण्यात आले होते. अनाथांची माय आज सगळ्यांना पोरकी करून गेली अशी खंत त्यांच्या निधनाच्या बातमीने आता सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट बनवण्यात आला त्यातून त्यांचा खडतर प्रवास सर्वांनीच पाहिला होता.

आपल्या कार्यात त्यांनी कित्येक अनाथांना आपल्या मायेची ऊब दिली होती. एवढेच नाही तर अन्याय होत असलेल्या स्रियांच्या पाठीशी देखील त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यांनी अनाथांसाठी व्यतीत केले होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर परदेशात देखील त्यांनी आपल्या कार्याची कीर्ती सर्वदूर पसरवली होती. ज्या नवऱ्याने आपला छळ केला आपल्याला घराबाहेर पडण्यास भाग पाडले शेवटच्या दिवसात त्यांचीच माय बनून त्या आपल्या नवऱ्याची सेवा करू लागल्या होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाले त्यावेळी त्या खूप हळव्या देखील झाल्या होत्या. १४ नोव्हेंबर १९४८ वर्धा येथे सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यावेळी त्यानी व्हीलचेअरवर बसूनच पुरस्कार स्वीकारला होता. आपल्या कामाची दखल घेतली गेली त्यामुळे सगळीकडून त्यांचे कौतुक करण्यात आले होते.
