आमच्यासारखे आम्हीच चित्रपटातील अभिनेत्रीचा मुलगा देखील आहे प्रसिद्ध अभिनेता… अनेक हिंदी मराठी मालिकेत करतोय काम

सचिन पिळगावकर यांनी मराठी सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. १९९० सालचा आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यानीच केले होते. सचिनजींच्या चित्रपटात अशोक सराफ यांना भूमिका ठरलेली असायची. अशी ही बनवाबनवी नंतर या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री अनेक चित्रपटातून पाहायला मिळाली. आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटात सचिन, अशोक यांच्यासोबत निवेदिता सराफ, रेखा राव, वर्षा उसगावकर, मंगला संझगिरी, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. ह्यातील अनेक कलाकारांबद्दल तुम्हाला माहित असेलच पण आज चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री मंगला संझगिरी यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

आमच्या सारखे आम्हीच या चित्रपटात मंगला संझगिरी यांनी सचिन आणि अशोकजींच्या आईची भूमिका निभावली होती. मंगला संझगिरी यांनी मराठी रंगभूमीला स्वतःला झोकून दिले होते. वयाच्या ४ थ्या वर्षापासूनच मंगला यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या मोठ्या नृत्यनाटिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मंगला संझगिरी यांनी मागे वळून पाहिलेच नाही. चित्रपट, नाटक अशा अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी भरीव योगदान दिले होते. ठाणे शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला आहे, अशातच उत्तम कालाकारांपैकी मंगला संझगिरी या त्यातल्याच एक मानल्या जात होत्या. ६० ते ९० च्या दशकात मंगला संझगिरी यांनी मराठी रंगभूमी चांगलीच गाजवली होती. विधाता, मराठा तेतुका मेळवावा , आत्ता होती गेली कुठे अशा चित्रपटातून त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. वाजे पाऊल आपले, मोठी आई, नेपोलियन, संशयकल्लोळ, स्वामिनी अशा नाटकातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित ‘मातोश्री’ या नाटकातून मंगला संझगिरी यांनी प्रमुख भूमिका गाजवली होती. अभिनयासोबतच त्यांनी नाट्य दिग्दर्शनातही पाऊल टाकले होते. ‘महिला कलादर्श’ ही संस्था स्थापन केल्यानंतर त्यांनी केवळ महिला कलाकार असलेलं ‘पद्मश्री धुंडिराज’ हे नाटक दिग्दर्शित केलं. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी ‘नाट्यघर’ ही संस्था सुरू केली.

अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे मंगला संझगिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगला संझगिरी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा देखील आता मराठी सृष्टीत चांगलाच स्थिरस्थावर झालेला पाहायला मिळतो. अभिनेते अतुल काळे हे मंगला संझगिरी यांचे सुपुत्र होय. सध्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या जीवाची होतिया काहिली मालिकेत ते नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. माझा होशील ना ,संदुक, बालकडू अशा चित्रपट मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले आहेत. अतुल काळे यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले आहे. महाराष्ट्र शाहीर या आगामी चित्रपटात ते यशवंतराव चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.