
काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे ‘ मालिका प्रसारित झाली. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची या मालिकेत प्रमुख भूमिका असल्याने ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय होणार हे अगोदरपासूनच प्रेक्षकांच्या मनात निश्चित ठरले होते आणि तसे या मालिकेच्या कथानका ने सार्थकी ठरवले हे वेगळे सांगायला नको. सुहिता थत्ते, राजन ताम्हाणे, समिधा गुरू, शर्मिला शिंदे, उमा सरदेशमुख अशा मातब्बर कलाकरांमुळे ही मालिका अधिकच खुलून गेलेली पाहायला मिळत आहे. मालिकेतील कलाकार “संकेत कोर्लेकर” याच्याबाबतीत नुकतीच एक दुःखद बातमी समोर येत आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेत संकेतने मल्हारची भूमिका साकारली आहे.

एका पोस्टद्वारे संकेतने आपल्या आजोबांचे निधन झाले असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावरुन त्याने आजोबांसोबतच्या काही आठवणींना उजाळा देत त्यांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “भाऊ आजोबा म्हणजे आईचे वडील.. देवाघरी गेले..कधी वाटलंच नव्हतं की हसत हसत काढलेला आमचा हा सेल्फी शेवटचा असेल.माझे खूप लाडके आजोबा.. कायम आपल्या कामाप्रती प्रामाणिक.आईलाही त्यांनी कायम हीच शिकवण दिली की आपण जे काम करतोय त्या जागेला मंदिर समजून तिथल्या कामाप्रती प्रामाणिक राहायचे. चार दिवसांपूर्वी मी आईला म्हणालो की सीरिअल मध्ये महत्वाचे सिन सुरु आहेत म्हणून मी इतक्यात रोह्याला येऊ शकत नाही. पर्वा आजोबा देवाघरी गेले आणि माझं इथे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आईने ही गोष्ट माझ्यापासून दोन दिवस लपविली आणि दुःख कितीही मोठं असलं तरी पहिले काम ही भाऊ आजोबांचीच शिकवण आईने मला दिली. काल रात्री तिने सांगितलं तेव्हा आजोबांसोबच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. खूप वाईट वाटलं. पण करत असलेल्या शूट मध्ये दुःख सावरण्याचे बळ मिळाले. आजोबा.. Love you” … संकेत कोर्लेकरने या मालिकेअगोदर गोळा बेरीज, टकाटक या चित्रपटात काम केले आहे तर हम बने तुम बने मालिकेतूनही काम केले आहे.