अग्गबाई सुनबाई या मालिकेत नुकतीच अनुरागची एन्ट्री झाली आहे त्यामुळे मालिकेला एक रंजक वळण लागलेले पाहायला मिळते आहे. अनुरागच्या येण्याने शुभ्राच्या आयुष्यात मोठा बदल घडून येणार आहे . अनुरागचे हे दिलखुलास पात्र प्रेक्षकांनाही आवडले असून पुढे त्याच्यामुळे शुभ्रा आणि सोहमचे नाते सुधारणार की आणखी काही वेगळे वळण पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण होत आहे. अनुरागची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराबद्दल आज काही गोष्टी जाणून घेऊयात…

मालिकेत अनुरागची भूमिका साकारली आहे “चिन्मय उदगिरकर” या अभिनेत्याने. गुलाबजाम, मेकअप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घाडगे अँड सून, श्यामचे वडील, वाजलच पाहिजे, नांदा सौख्यभरे, सख्खे शेजारी, स्वप्नांच्या पलीकडले अशा विविध मालिका आणि चित्रपटातून चिन्मयने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये त्याने पार्टीसिपेट केले होते इथूनच त्याच्या अभिनयाला खरा वाव मिळत गेला असे म्हणायला हरकत नाही. सहजसुंदर अभिनय ही चिन्मयच्या अभिनयाची खासियत म्हणावी लागेल. अभिनेत्री “गिरीजा जोशी” ही चिन्मयची पत्नी आहे. २०१५ साली त्यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला होता. गिरीजाने देऊळ बंद, गोविंदा, प्रियतमा, धमक, वाजलच पाहिजे या चित्रपटातून प्रमुख नायिका साकारली आहे. गिरीजा जोशी ही मूळची रोहा, रायगडची. रोहामधून आपले शालेय शिक्षण घेतल्यावर वाशी, नवी मुंबईत ती स्थायिक झाली त्यानंतर अभिनयाचे वेध तिला लागले आणि डेहराडून येथील सेंट जोसेफ ऍकॅडमीमध्ये अभिनयाचे धडे तिने गिरवले.

अभिनेत्री “गिरीजा जोशी” हिला २०१३ साली मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी सोबत गोविंदा चित्रपटात तिला झळकण्याची संधी मिळाली. यात तिने श्रावणी ची भूमिका सुरेख साकारलेली पाहायला मिळाली. देऊळ बंद मधून गश्मीर महाजनी आणि गिरीजा यांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. या चित्रपटानंतर गिरीजा फारशी कुठल्या चित्रपटात पाहायला मिळाली नाही मात्र अभिनयाव्यतिरिक्त डान्सची आवड ती आजही जोपासताना दिसत आहे. गिरीजा स्वतःची डान्स अकॅडमी चालवत असून यातून अनेकांना तिने नृत्याचे धडे दिले आहेत. तिचे डान्सचे अनेक व्हिडिओ सोडियावर व्हायरल देखील झालेले आहेत. घरसंसार आणि नृत्याचे क्लासेस हे तिचे आता नित्याचेच बनले असून यातच ती खूप समाधानी असलेली पाहायला मिळते आहे. अभिनेता “चिन्मय उदगिरकर” आणि त्यांची पत्नी “गिरीजा जोशी” हिला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…