अग्गबाई सुनबाई या मालिकेत दिलखुलास लीना आज्जीचे पात्र दर्शवले आहे. आजोबांची त्या खास मैत्रीण असल्याने त्यांच्यातील गमती जमती प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. लीना आज्जीचे हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात…अग्गबाई सुनबाई मालिकेत लीना आज्जी साकारली आहे अभिनेत्री “शुभा गोडबोले” यांनी. शुभा गोडबोले या मराठी नाट्य, चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्या ह्या सृष्टीत कार्यरत आहेत.

शुभा गोडबोले यानी why so गंभीर, ऐश्वर्या ब्युटी पार्लर, चेहरा मोहरा या गाजलेल्या नाटकांतून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘ट्रान्स affair’ या प्रायोगिक नाटकाचे लेखन शुभा गोडबोले यांनी केले होते तर याच नाटकातून त्यांनी अभिनय देखील साकारला होता. गेल्या वर्षी पार पडलेल्या महाविद्यालयीन ऑनलाईन अभिवाचन स्पर्धेच्या परीक्षक म्हणून शुभा गोडबोले यांनी जबाबदारी पार पाडली होती. यात रवींद्र ढवळे, अमृता मोडक, मेधा आलकरी यांनीही त्यांच्यासोबत परीक्षक म्हणून काम सांभाळले होते. झोमॅटो, गोदरेज होम कॅमेरा अशा व्यावसायिक जाहिरातीतूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. सायबर क्राईमच्या वाढत्या गुन्हेगारीवरून मुंबई पोलिसांच्या उपक्रमाअंतर्गत रुईया कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी “स्मार्ट बनिये सुरक्षित रहीये” ही जाहिरातींची सिरीज बनवली होती. या सिरीजच्या माध्यमातून रुईयाच्या विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. या सिरीजमध्ये शुभा गोडबोले या देखील झळकल्या होत्या. नाटक, व्यावसायिक जाहिराती आणि आता अग्गबाई सुनबाई मालिका असा त्यांचा प्रवास चालू आहे.

या प्रवासात देश विदेशात फिरण्याची देखील त्यांना भारी हौस आहे. फावल्या वेळात घोडेस्वारी करणेही त्यांना प्रचंड आवडते आणि या वयातही आपल्या फिटनेसला त्या पहिले प्राधान्य देताना दिसतात हेही तितकेच कौतुकास्पद म्हणावे लागेल. अग्गबाई सुनबाई या मालिकेतून शुभा गोडबोले पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकत आहेत. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका आहे. त्यात त्यांना झी मराठीची मालिका साकारण्याची संधी मिळते आहे हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. या मालिकेतील लीना आज्जीच्या भूमिकेसाठी आणि आज १७ मे रोजी त्यांचा वाढदिवसही आहे त्यानिमित्तही शुभा गोडबोले यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!…