असे अनेक मराठी चित्रपट आहेत जे वारंवार पाहावेसे वाटतात. खासकरून कॉमेडी, जादू, किंवा थरारक चित्रपटांना लोक जास्त पसंती देताना पाहायला मिळत. २००४ साली अगबाई अरेच्चा! हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट एका आगळ्या वेगळ्या कथानकामुळे चांगलाच प्रसिद्ध झाला. देवाच्या आशीर्वादामुळे मुलींच्या तसेच महिलांच्या मनातलं बोललेलं नायकाला ऐकु यायचं. उत्कंठावर्धक कथानक, सुपरहिट गाणी , सोनाली बेंद्रेचं आयटम सॉंग आणि प्रथमच मोठ्या पडद्यावर दिसणारी साताऱ्याची प्रसिद्ध बगाड यात्रा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवताना दिसला. तेजस्विनी पंडितचा पदार्पणातील हा पहिलाच मराठी चित्रपट यात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती.

तर संजय नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, प्रियांका यादव, भरत जाधव, रेखा कामत, सुहास जोशी, शुभांगी गोखले, विजय चव्हाण, भारती आचरेकर, रसिका जोशी, विजय चव्हाण अशा अनेक नामवंत कलाकारांची साथ लाभली. चित्रपटातील बरीचशी कलाकार मंडळी आजही मराठी सृष्टीत स्थिरस्थावर राहिलेली पाहायला मिळाली तर काही कलाकारांनी मात्र या जगाचा निरोप घेतला. या चित्रपटात एक चिमुरडी झळकली होती. या चिमुरडीने मनातल्या मनात नायकाला वेडा म्हणून हाक मारली होती. मात्र आपण मनात म्हटलेली गोष्ट या काकांना कशी काय समजली? असा प्रश्न तिला पडला होता. ‘ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा..’ असे म्हणून ही चिमुरडी नायकाला वाकोल्या दाखवून हसताना दिसली. २००४ साली चित्रपटात झळकलेली ही चिमुरडी आता चक्क चित्रपटाची नायिकाच बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या मुलीला तुम्ही ओळखलंही असेल कारण ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून दिग्दर्शक केदार शिंदे यांचीच मुलगी सना शिंदे आहे. अनेकांना हे वाचून नक्कीच सुखद धक्का बसला असेल. केदार शिंदे यांची मुलगी अभिनेत्री सना शिंदे एका बहुचर्चित चित्रपटातून नायिकेची भूमिका साकारणार आहे.

केदार शिंदे यांनी आजवर अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. आपल्या लेकीला ते महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातून लॉन्च करणार आहेत. हा चित्रपट सनाचे पंजोबा म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे तर केदार शिंदे यांची लेक अभिनेत्री सना शिंदे शाहिरांची पत्नी भानुमती कृष्णराव साबळे यांची म्हणजेच आपल्या पणजीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे सनासाठी हा चित्रपट तेवढाच महत्वाचा असणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून सना आपल्या पणजीचीच भूमिका साकारणार असल्याने खूपच उत्सुक झाली आहे. पदार्पणातील या पहिल्याच चित्रपटासाठी अभिनेत्री सना शिंदे हिला खूप खूप शुभेच्छा.