
आज ४ जून अभिनयातील सम्राट अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस. अशोक सराफ यांच्या कारकीर्दीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातून रंगभूमीवर पाऊल टाकलं होतं. परंतु नाटकातून काम करत असताना पुरेसं मानधन मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. पांडू हवालदार या चित्रपटाने अशोक सराफ यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. सखाराम हवालदार हे पात्र साकारून अशोक सराफ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. या कारकिर्दीत त्यांना रंजना सारखी गुणी अभिनेत्री भेटली. रंजना सोबत अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्यांचे एकत्रित असलेले चित्रपट सुपरडुपर हिट ठरले होते.

यातूनच दोघांचे प्रेम जुळून आले असे म्हटले जाते. त्यांच्यासोबत काम करणारे बरेचसे कलाकार देखील याबद्दल बोलताना दिसतात. चित्रपटातून रंजनाची भूमिका नेहमीच सरस ठरायची. रंजनाचा अपघात झाला त्यानंतर रंजना अंथरुणाला खिळून राहिली. अगदी रंजनाच्या आई वत्सला देशमुख यांनी देखील रंजनाच्या अखेरच्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या होत्या. तिचं दुःख मला पाहावत नव्हतं असंही त्या बोलल्या होत्या. अपघातानंतर अशोक सराफ यांनी रंजनाची साथ सोडली असे कायम बोलण्यात येते. रंजनाला तिच्या दुःखात सोडून अशोक सराफ यांनी निवेदितासोबत आपला संसार थाटला असेही म्हटले जाते. सोशल मीडियावर हा विषय कित्येकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र अशोक सराफ यांना कधीच रंजनाबद्दल फारसे काही विचारण्यात आलेले नाही. किंवा ते देखील स्वतःहून रंजनाबद्दल मोकळेपणाने बोललेले दिसले नाहीत. मात्र अशोक सराफ यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्यांनी प्रथमच रंजनाबद्दलच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. अशोक सराफ म्हणतात की, ‘ रंजना जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीत आली तेव्हा तिने विनोदी भूमिका केल्याच नाहीत.

गंभीर भूमिकांमुळे रंजनाला आघाडीची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. माझ्यासोबतच तिने विनोदी भूमिका साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या या भूमिकांचे मोठे कौतुक होत होते अगदी माझ्यापेक्षाही ती वरचढ ठरत होती. ‘विनोदात रंजना अशोकला भारी पडते’ असेही बोलले जायचे. हे ऐकून मलाही माझ्या या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटायचं कारण त्यावेळी ती एक नटी म्हणून सरस आहे ह्यावर मी शिक्कामोर्तब केला होता. ती कुठलीही भूमिका तितक्याच ताकदीने उभी करू शकते यावर माझा विश्वास होता. त्यामुळे ती माझ्यापेक्षा सरस ठरली तरी मी या मैत्रिणीसाठी आनंदी असायचो. रंजना व्यतिरिक्त मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण तिच्यासारखी दुसरी नटी कोणीच नाही, तिच्यासारखी तीच’. असे अशोक सराफ यांनी रंजनात दडलेल्या एका कलाकाराचे कौतुक केले आहे.