मराठी मालिका अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांचे मे महिन्यात निधन झाले होते. त्यांचे वडील प्रदीपकुमार महांगडे हे पसरणी गावचे सुपुत्र, ज्येष्ठ रंग कर्मी , नाट्यकर्मी, राजकारणातील भीष्माचार्य, हाडाचे शेतकरी म्हणून सर्वदूर परिचयाचे होते. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच त्यांनी नाट्यप्रेम जोपासले होते. वाईत रंगकर्मीना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले होते.एवढेच नाही तर चार कौटुंबिक नाटकांचे लेखनही त्यांनी केले होते. त्यांच्यातील या सुप्त गुणांचा वारसा त्यांची मुलगी अश्विनीमध्ये पाहायला मिळतो आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठाण अंतर्गत अश्विनी महांगडे यांनी केलेले सामाजिक कार्य नेहमीच कौतुकास पात्र ठरले आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र भर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय त्यांनी या प्रतिष्ठानमार्फत केली होती. त्यावरून त्यांचे खूप कौतुक देखील झाले. तर दोन दिवसांपूर्वी त्यांनी पहिली रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल केली आहे.

मात्र अश्विनी महांगडे या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. त्यांनी आपल्या वडिलांची आठवण म्हणून हातावर एक सुंदर टॅटू काढून घेतला आहे. सध्या त्यांचा हा टॅटू खूप चर्चेत आला आहे. या टॅटूचे एक खास वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या वडिलांचा हात धरणारी ही लेक त्यांना कायम आपल्यासोबत अनुभवताना दिसत आहे. हा टॅटू शेअर करत अश्विनी महांगडे म्हणतात ….”आपल्या सोबत कोणी, कधी आणि किती रहावं हे आपण ठरवावे. मला माझ्या सोबत नाना हवे आहेत. तसे ते कायम आहेतच म्हणा”. अश्विनी महांगडे सध्या आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसत आहे. अरुंधतीला नोकरी मिळावी या प्रयत्नात ती अरुंधतीच्या घरी जाऊन तिची भेट घेत आहे. एका सामाजिक संस्थेमध्ये अरुंधतीला काम मिळवून देऊन तिचा प्रवास सुखकर कसा होईल या प्रयत्नात सध्या ती दिसत आहे. या मालिकेसोबतच अश्विनी महांगडे आता चक्क हिंदी मालिकेतही झळकणार आहेत. सोनी वाहिनीवरील ‘मेरे साईं’ या हिंदी मालिकेतून अश्विनी एका महत्त्वाच्या भूमिकेतून झळकणार आहे. अश्विनीची ही पहिलीच हिंदी मालिका आहे त्यामुळे आपल्या भूमिकेबाबत ती अधिकच उत्सुक असलेली दिसत आहे.