
समाजात आजही मुलगी नको ही मानसिकता इतकी रूजली आहे की मुलींच्या जन्माकडे सकारात्मकरित्या पाहण्याचा संदेश अनेक मनोरंजनाच्या माध्यमातून दिला जातो. याच हेतूने छोट्या पडदयावर मुलगी झाली हो ही मालिका सुरू झाली आणि या मालिकेच्या कथानकाने, कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांनीही या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाकाळातही या मालिकेतील कलाकारांनी आरोग्याची काळजी घेत मनोरंजन सुरू ठेवले. मात्र गेल्या काही दिवसात या मालिकेभोवती वादाने पिंगा घालायला सुरूवात केली तसेच मालिकेतील काही कलाकारांनी आपल्या भूमिकेलाच रामराम ठोकल्याने ही मालिका चर्चेत आली. नुकताच मालिकेत आर्याची भूमिका करणाऱ्या श्वेता आंबिकर या अभिनेत्रीनेही मालिकेतून काढता पाय घेतला आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुलगी झाली हो ही मालिका तिच्या टीआरपी किंवा नव्या ट्रेंडमध्ये नव्हे तर मालिकेतील नायिका माऊच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या अभिनेता किरण पाटील याला कोणतीही सूचना न देता मालिकेतून काढून टाकले. त्यापूर्वी किरणने राजकीय पोस्ट त्याच्या सोशलमीडियावर शेअर केल्याने हा निर्णय घेतल्याचे चॅनेलने सांगितले. पण यावर आक्षेप घेत किरण माने यानेही कोर्टात जाण्याची धमकी दिली. प्रकरण इतके वाढले की या मालिकेतील महिला कलाकारांनी किरण मानेवर असा आरोप केला की त्याचे सेटवरील गैरवर्तनाने आम्ही त्रस्त झालो होतो. पुन्हा यावरून किरण माने भडकला. या वादातून ऑफस्क्रिन मतभेदांची मालिका सुरू झाली होती. किरण माने याच्या जागी नवा अभिनेता घेऊन मालिका पुन्हा सुरळीत झाली, पण मालिकेभोवती फिरणारा वादाचा पिंगा काही थांबेना. काही दिवसांपासून मालिकेचा टीआरपी घसरल्याच्या बातम्या आल्या आणि त्यापाठोपाठ ही मालिकाच बंद होणार अशी अफवा पसरली. त्यावरूनही किरण माने याने , मला हाकलवणाऱ्या मालिकेलाच चॅनेलने लाथ मारू हाकललं अशी पोस्ट केली. पण मालिका बंद होणार नसून तिची वेळ बदलून दुपारी दोन वाजता केल्याचं चॅनेलने जाहीर केलं.

दरम्यान या मालिकेतील एक तगडा अभिनेता अजय पूरकर याने गेल्या आठवड्यात या मालिकेला रामराम केल्याची पोस्ट शेअर केली. पावनखिंड सिनेमातील बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला मिळालेल्या यशानंतर अजय आता शेर शिवराज या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळेच त्याने मालिका सोडत असल्याचे सांगितले. आठवडाभरातच अजून् एका अभिनेत्रीने मालिकेतून निरोप घेतला आहे. आर्याच्या भूमिकेतील श्वेता आंबिकर हिनेही मालिकेला रामराम ठोकल्याचे सांगितले आहे. मनोरंजन विश्वातील अपडेट देणाऱ्या माध्यमाच्या सोशलमीडियावरून ही बातमी शेअर केली आहे. मालिकेवरून होणारे वाद, घसरत चाललेला टीआरपी आणि निर्माण होणाऱ्या नव्या संधी यामुळे एकेक कलाकार या मालिकेतून काढता पाय घेत असल्याने मालिकेची वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू आहे.