बॉलिवूड चित्रपट अभिनेता हेमंत बिर्जे यांच्या गाडीला काल मंगळवारी ११ जानेवारी रोजी अपघात झाला होता . ते स्वतः गाडी चालवत होते परंतु औषधांच्या सेवनामुळे त्यांना डुलकी लागली यातच गाडीवरील ताबा सुटून ती गाडी डिव्हाईडरला धडकली. या अपघातात हेमंत बिर्जे यांना मुका मार लागला आहे थोडक्यात जीव वाचला तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. हेमंत बिर्जे यांच्यासोबत गाडीत त्यांच्या पत्नी अमना हेमंत बिर्जे आणि मुलगी रेश्मा तारिक अली खान हेही सोबत होते.

अपघातामुळे अमना बिर्जे यांच्या चरहऱ्यावर मार लागला असून त्यांच्या मुलीलाही किरकोळ दुखापत झाली आहे. हेमंत बिर्जे हे काही दिवसांपूर्वी आपल्या मोठया मुलीला भेटायला मुंबईला गेले होते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगीही होती. मुलीची भेट घेऊन मंगळवारी ते मुंबईहून पुण्याला स्वतःच्या गाडीने येत होते. पुण्यातील धानोरी परिसरात हेमंत बिर्जे आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गाने ते मुंबईहून पुण्याला यायला निघाले होते. दरम्यान सर्दी झाल्याने हेमंत बिर्जे यांनी औषधं घेतली होती. या औषधांमुळे त्यांना झोप येऊ लागली होती. उर्से टोलनाक्याच्या अगोदरच त्यांना डुलकी लागली आणि त्यांची गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. हा अपघात होताच शीरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबियांना दवाखान्यात दाखल केले.

हेमंत बिर्जे यांनी १९८५ साली टारझन हा बॉलिवूड चित्रपट अभिनित केला होता. त्यांच्यासोबत मराठमोळी किमी काटकर मुख्य भूमिकेत झळकली होती. पदार्पणातील पहिल्याच चित्रपटामुळे हेमंत बिर्जे प्रसिद्धी मिळवताना दिसले. त्यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारलेल्या दिसल्या. विराना, तेहखाना, शेर ए हिंदुस्तान, चांडाल, आज के अंगारे, कब्रस्तान , मर्दानगी, आग के शोले, गर्व, गलियो का बादशाह असे अनेक बॉलिवूड चित्रपट त्यांनी अभिनित केले आहेत. सलमान खानसोबत गर्व चित्रपटात ते झळकले होते. हेमंत बिर्जे यांची मुलगी सोनिया ही देखील अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून ओळखली जाते.