वंदना गुप्ते शिरीष सोबत पुन्हा एकदा अडकल्या विवाहबंधनात… सेलिब्रिटींकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

मराठी मालिका, चित्रपट तसेच नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्या आहेत. लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत शिरीष यांच्यासोबत पुन्हा एकदा लग्नाचा सोहळा साजरा केला. यावेळी परदेशी असलेली त्यांची मुलं आणि जवळचे नातेवाईक सुद्धा आवर्जून हजेरी लावताना दिसले. शिरीष आणि वंदना गुप्ते यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून , कपाळावर मुंडावळ्या सजवून हा क्षण मंगलाष्टकेच्या आवाजात पुन्हा एकदा अनुभवला. वरमाला घातल्यानंतर शिरीष यांनी वंदना गुप्ते यांच्या पुढे हात जोडून नमस्कार केला त्यावेळी उपस्थितांना मात्र आपले हसू आवरले नव्हते. त्याच क्षणी वंदना गुप्ते यांनाही शिरीष यांचे वागणे फार मिश्किल वाटले आणि यांच्यासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हा सोहळा थाटात पार पडल्याचे पाहून सेलिब्रिटींनी सुद्धा वंदना आणि शिरीष यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हा सोहळा पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने सुकन्या कुलकर्णी मोने ,निर्मिती सवनर, स्पृहा जोशी, सुयश टिळक, दीपा परब, निना कुलकर्णी अशा मोठमोठ्या सेलिब्रिटींनी त्यांचे कौतुक केले आहे. वंदना गुप्ते यांनी या लग्नसोहळ्याच्या गमतीजमती एका पोस्टद्वारे कळवल्या आहेत. सत्यापित अर्थात व्हेरिफाय आमचा ५० वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला! माझ्या वहिनी आणि भाची युएसए आणि कॅनडाहून सर्वजण विमानाने आले आणि आमची लाडकी मुलगी, स्वप्ना, आमच्या खास दिवशी आमच्यासोबत राहण्यासाठी वेस्ट इंडीजहून आली!! या सर्वांनी मिळून घरी एक छोटासा विवाह सेटअप लावला. जेणेकरून आम्ही आमचे सर्वात मौल्यवान क्षण पुन्हा एकदा अनुभवू शकू. आमची मुलं हजेरी लावू शकतील आणि आमच्या लग्नाचा आनंद घेऊ शकतील याचा मला आनंद आणि आनंद झाला!! तुमच्या हृदयस्पर्शी उपस्थितीने आमचा दिवस अधिक खास बनवल्याबद्दल सर्वांचे आभार! असे म्हणत वंदना गुप्ते यांनी या क्षणाचे काही फोटो आणि एक छानसा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या वर्षी शिरीष गुप्ते यांनी वंदना यांच्यासाठी कार गिफ्ट केली होती. त्यांचे हे लव्ह मॅरेज आहे. एकदा गाण्याच्या कार्यक्रमात लावणी गाताना मनोरमा वागळे यांनी वंदनाला पाहिलं आणि तिथेच ‘ पद्मश्री धुंडिराज’ या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळवून दिली. त्यानंतर कमलाकर सोनटक्के यांच्या ‘जसमा ओडन’ या नाटकात काम मिळाले. हे नाटक पाहायला शिरीष गुप्ते तिथे आले होते. शिरीष गुप्ते त्यावेळी वकिलीचे शिक्षण घेत होते मात्र नाटक पाहायची विशेष आवड त्यांना होती. नाटकाच्या प्रयोगाला हजर राहिल्यावर लव्ह ऍट फर्स्ट साईट असे म्हणतात तसेच शिरीष गुप्ते यांच्याबाबत झाले. वंदनाला समोर पाहताच शिरीष गुप्ते वंदनाच्या प्रेमात पडले. एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यावर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्नही केले. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा