
टीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिकांमध्ये गेल्या काही दिवसात मोठा पडदा गाजवणाऱ्या कलाकारांची एन्ट्री होत आहे. सिनेमांकडून मालिकांकडे येणाऱ्या सेलिब्रिटी कलाकारांच्या याच यादीत अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हीदेखील सामील झाली होती. खरंतर ऊर्मिलाची अभिनयाची सुरूवात मालिकेतूनच झाली पण त्यानंतर ती मोठ्या पडदयावर रमली होती. पण दोन महिन्यांपूर्वी ऊर्मिलाच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी येऊन धडकली आणि ती म्हणजे ऊर्मिलाचं १२ वर्षानंतर टीव्ही मालिकेत होणारं पुनरागमन. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ऊर्मिला दिसणार ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच होती. मात्र आता मालिका सुरू होऊन एक महिने होतात न होतात तोच ऊर्मिलाने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

गाण्याचा ध्यास घेऊन त्यासाठी मेहनत घेणारी स्वरा ही सात आठ वर्षाची मुलगी, स्वरामधील गाण्याच्या कलेला साथ देणारी आई वैदेही यांच्या नात्यावर बेतलेली तुझेच मी गीत गात आहे या मालिकेची खूप चर्चा झाली. अर्थातच या चर्चेचं कारण होतं ते अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हिचं बारा वर्षानंतर टीव्हीवर होत असलेलं पुनरागमन. सिनेमांमध्ये ग्लॅमरस भूमिकांमध्ये आणि व्यक्तीगत आयुष्यातही मॉडर्न राहणाऱ्या ऊर्मिलाचा या मालिकेतील लुक अत्यंत साधा होता. हा लुकही तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आवडला होता. स्टार प्रवाहसारखी वाहिनी, सतीश राजवाडे यांच्यासारखे नेतृत्व, अभिजित खांडकेकरसारखा सहकलाकार आणि कौटुंबिक कथा यामुळे ही मालिका स्वीकारल्याचे ऊर्मिलान सांगितलं होतं. 2 मे पासून ही मालिका सुरू झाली आणि मे महिना संपताना ऊर्मिला साकारत असलेल्या वैदेही या पात्राचा मृत्यूचा सीन शूट झाला. एक महिन्यात ऊर्मिलाच्या व्यक्तीरेखेचा अंत दाखवण्यामागे ऊर्मिलाने या मालिकेतून घेतलेली एक्झिटच कारणीभूत आहे. ऊर्मिलाने ही मालिका एका महिन्यातच का सोडली याचे कारण अदयाप स्पष्ट झालेलं नाही. पण आता ऊर्मिला कोठारे या मालिकेतून एक्झिट घेत आहे हे समोर येताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ही मालिका सुरूवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरली नसल्याचंही बोललं जातंय.ऊर्मिलाच्या पुनरागमनाचं जसं कौतुक झालं तशी ऊर्मिला या मालिकेच्या निमित्ताने ट्रोलही झाली होती. कोठारे व्हिजन हे ऊर्मिलाचा नवरा आदिनाथ कोठारे याचं होम प्रॉडक्शन असताना ऊर्मिलाने कमबॅक करण्यासाठी दुसऱ्या निर्मितीसंस्थेचा आधार का घेतला यावरूनच खूप चर्चा झाली होती. इतकच नव्हे तर ऊर्मिला आणि आदिनाथ यांच्या नात्यात दुरावा आल्यामुळेच ऊर्मिलाने घरच्या प्रॉडक्शनसोबत काम करण्याचा पर्याय निवडला नाही अशीही सोशल मीडियावर चर्चा झाली होती. अखेर आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी एकत्र फोटो शेअर करत त्यांच्या नात्यात काहीही दुरावा नसल्याचं सांगितलं होतं.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवरील धमाल किस्से, व्हिडिओ, फोटो ऊर्मिला तिच्या सोशल मीडियावर शेअर करत होती. वैदेही हे पात्र खूप चांगलं असून काम करायला मज्जा येत असल्याची प्रतिक्रियाही ऊर्मिलाने अनेकदा दिली होती. पण तरीही दोन महिन्यातच ऊर्मिलाने या मालिकेला रामराम का ठोकला याचे कारण काही तिच्या चाहत्यांसमोर आलेले नाही. कलाकाराने एखादी मालिका सोडणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. अनेक मालिकांमधले कलाकार मालिका सोडतात आणि त्यांच्या जागी नवा कलाकार ते पात्र निभावतो हे प्रेक्षकांच्याही सवयीचं झालं आहे. पण या मालिकेतील ऊर्मिलाची भूमिका प्रमुख होती. तसेच ती मालिका सोडत असल्याची कोणतीही बातमीही बाहेर पडली नव्हती. ऊर्मिलाने मालिकेला रामराम केल्यानंतर तिच्या जागी कोण येणार हा प्रश्नही निकाली निघाला आहे कारण मालिकेत तिच्या वैदेही या पात्राचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. ऊर्मिला साकारत असलेल्या वैदेही या पात्राचा मृत्यू झाल्याने या मालिकेत येत्या काळात कोणतं वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.