
जेव्हा एखाद्या मालिकेच्या निमित्ताने कलाकार एकत्र येतात तेव्हा ती त्यांची फॅमिलीच होत असते. सेटवर रोज सगळे कलाकार येतात आणि त्यांची ऑफस्क्रिन धमाल सुरू असते. जेव्हा मालिका संपते तेव्हा सेटवरचं हे कुटुंबही एकमेकांपासून वेगळं होतं. त्यापैकी कधी काही कलाकार नव्या मालिकेत पुन्हा भेटतात तर काहीजणांना भेटण्यासाठी निमित्तच सापडत नाही. असच काहीसं झालं १२ वर्षापूर्वी टीव्हीवर गाजलेल्या असंभव यामलिकेतील कलाकारांच्या बाबतीत. पण मालिका संपल्यानंतर १२ वर्षांनी या मालिकेतील काही कलाकारांनी गेटटुगेदर करत अनेक आठवणींना उजाळा दिला. कलाकारांच्या या रियुनियनची पोस्ट बघून चाहत्यांकडून या मालिकेचा सिक्वेल यावा अशा कमेंट येत आहेत.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली ऊर्मिला कोठारे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिने नवीन काय पोस्ट केलंय याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असते. १२ वर्षापूर्वी असंभव ही मालिका संपली तेव्हा एकमेकांसाठी हललेले निरोपाच हात भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असं म्ह्णत ऊर्मिलाने शेअर केलेल्या एका खास फोटोंवर नेटकऱ्याची नजर खिळली. या फोटोमध्ये असंभव या मालिकेतील उमेश कामत, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, शर्वरी पाटणकर आणि ऊर्मिला ही चौकडी दिसत आहे. अर्थात या मालिकेत दर्जेदार कलाकारांची फौज होती पण १२ वर्षांनी किमान या चार कलाकारांनी भेटत रियुनियनला सुरूवात केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. पुनर्जन्मावर आधारीत रहस्यमय अशा या असंभव मालिकेने या कलाकारांना घराघरात पोहोचवलं. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय हे सगळच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं होतं. सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेचं लेखन चिन्मय मांडलेकर याने केलं होतं. नीलम शिर्के, ऊर्मिला कोठारे आणि उमेश कामत यांच्या प्रेमाचा त्रिकोण आणि त्यात पुनर्जन्मासारखा हटके विषय यामुळे ही मालिका खूपच गाजली. ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर, सुनील बर्वे, मानसी साळवी, मधुराणी प्रभुलकर यांच्याही या मालिकेत भूमिका होत्या. याच मालिकेतील एक महत्त्वाची भूमिका साकारणारी शर्वरी पाटणकर हिने कलाकारांच्या पुनर्भेटीचा योग जुळवून आणला.

ऊर्मिला कोठारे हिने या रियुनियनचा फोटो शेअर करत छान ओळी लिहिल्या आहेत. तिने तिच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, आम्ही आठवलो का?, असंभव रियुनियन, तेही बारा वर्षांनी. हे सगळं घडवून आणल्याबद्दल शर्वरी पाटणकर हिचे धन्यवाद. आहाहाहा…खूप दिवसांनी खूप हसलो. जुने दिवस आठवले आणि शूटिंगच्या दिवसातील गंमतीही आठवल्या. मला खूप आवडलं हे. असं पुन्हा केलं पाहिजे. ऊर्मिलाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरपूर कमेंट केल्या आहेत. सर्वांचा अभिनय छान होता असं म्हणत चाहत्यांनीही या मालिकेच्या आठवणी जागवल्या. खरं तर या मालिकेचा पुढचा सीझन यावा अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. या मालिकेच्या शेवटी इंदुमती मूर्तीत कायम राहते असं दाखवण्यात आलं आहे. याच नोटवर मालिकेचा दुसरा सीझन येऊ शकतो असं चाहते म्हणत आहेत. मालिकेचा पुढचा भाग येईल की नाही माहित नाही, पण या मालिकेतील कलाकारांची पुढची भेट मात्र नक्की होईल आणि ते फोटोही ऊर्मिला शेअर करेल हे नक्की.