मराठी रंभूमीचा एक वेगळा असा इतिहास आहे. अशात मराठी संस्कृती जपत मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री रसिक प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. मात्र रानबाजार या वेबसिरीजने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. २० मे पासून ही सिरीज सुरू झाली आहे. वेबसिरीज सुरू होण्यापूर्वी तेजस्विनी आणि प्राजक्ताचे दोन टिजर व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्रींचा अतिशय बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. आता मराठमोळ्या अभिनेत्रींचा एवढा मादकपणा काही मराठी प्रेक्षकांना जरा खटकलाच. अनेकांनी यावरून दोघींनाही जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली. अशात या दोघींच्या अभिनयाचे कौतुक करणाऱ्या व्यक्ती देखील आहेत मात्र टीका करणाऱ्यांच प्रमाण जरा जास्तच आहे. मात्र आता या सर्व नेटकऱ्यांचे तेजस्विनी पंडितच्या आई ज्योती चांदेकर यांनी चांगलेच कान पिळलेत.

त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रानबाजारचा एक पोस्टर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या मुलीचा फोटो देखील आहे. तसेच त्यांनी ही पोस्ट शेअर करत कॅपशनमध्ये समीर परांजपे यांनी लिहिलेला लेख पोस्ट केला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “रानबाजार वेबसीरियल वरून जे रान उठले आहे, त्यावरून लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बोल्ड सीन आणि जरा भडक भाषेने इतके भेदरून जायचे मुळात कारण काय? ज्यांनी नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा काव्यसंग्रह वाचला असेल, ज्यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या स्थितीबद्दल नीट कल्पना असेल त्यांना रानबाजारसारख्या सीरियल अगदी मामुली वाटतील. त्यातील अभिनेत्रींनी जी काही कथित धाडसी दृश्ये दिली आहेत त्यापेक्षा अधिक उत्तेजक असे बरेच काही इंटरनेटवर सहजी उपलब्ध असते. आणि ते कोण कोण पाहाते याबद्दल बेधडकपणे लिहिले तर अनेकांची भारतीय संस्कृती लगेच डळमळीत होईल. रानबाजार वेब सिरीयल दिग्दर्शित करणारे, ती लिहिणारे तुमच्या आमच्यासारखेच चांगल्या घरातील आहेत आणि त्यात अभिनय करणारेही कोणी उठवळ नाहीत. रानबाजार ही एक कलाकृती आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे. उगाच अनेक लोक स्वतः आयुष्यात पाळत नसलेल्या मूल्यांचे समाज माध्यमावर स्तोम माजवत बसतात तेंव्हा त्यांची शरम वाटते. जगात जे गलिच्छ असते असे मानले जाते ती आपल्याच समाजाची घाण असते. ती स्पष्टपणे दाखवणे यात काहीही चूक नाही. रानबाजार असे त्या मालिकेचे नाव असले तरी खरे नाव त्यामुळे प्रत्येकाच्या मनात येतेच.

इथूनच त्या मालिकेच्या यशाला सुरूवात होते. समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे सध्याच्या काळात तर आवश्यकच आहे. कारण नको त्या गोष्टी तकलादू मूल्यांच्या पदरात लपवून ठेवणाऱ्या लोकांना सध्या सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळे रानबाजारला विरोध होणे स्वाभाविकच. पण या मालिकेला माझं पूर्ण पाठिंबा आहे.” यावरच पुढे ज्योती चांदेकर समीर यांचे आभार मानत म्हणल्या की, ” प्रिय समीर, मी तुम्हाला प्रत्यक्षात ओळखत नाही पण एक प्रेक्षक म्हणून आणि मुख्य म्हणजे एक आई म्हणून अगदी योग्य शब्दात तुम्ही माझ्या भावनांची मांडणी केलीत.” धन्यवाद आणि आशिर्वाद ! एक खरी आणि धाडसी वेब मालिका केल्याबद्दल एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून अभिजीत पानसे ह्यांचे अभिनंदन !” पुढे मालिका पाहण्यासाठीचे आवाहन करत, ” जरुर बघा माझ्या लेकीला आणि अनेक मातब्बर कलाकारांना “रानबाजार” या वेब मालिकेत. आजपासून प्रदर्शित होतोय प्लेनेट मराठी app वर.” असेही त्या म्हणाल्या.