अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही तीने छोट्या पडद्यावर आगमन केले. अभिनयाचे हे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळाले आहे. मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित या तेजस्विनीच्या आई. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातून दोघी माय लेकीने सिंधुताईंची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. तेजस्विनीने अभिनित केलेली रानबाजार ही वेबसिरीज तिच्या बोल्ड भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली होती.

त्यावेळी ज्योती चांदेकर यांनी तेजस्विनीच्या अभिनयाचे कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली होती. गुरू, दमलेल्या बाबाची कहाणी, पाऊलवाट, सांजपर्व, भिकारी, बिनधास्त, ढोलकी, तिचा उंबरठा, मिसेस आमदार सौभाग्यवती अशा चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ज्योती चांदेकर यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नुकतेच ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने’ त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या आईच्या झालेल्या या सत्कार सोहळ्यानिमित्त तेजस्विनीने एक खास पोस्ट लिहिली आहे. कामाच्या व्यस्त श्येड्युल मुळे आईच्या हातचं खायची संधी मिळाली नव्हती त्यावेळी तेजस्विनीचे वडील त्यांची आई बनुनच सांभाळ करायचे. वयाच्या १६ वर्षी आईच्या हातचं खायची संधी मिळाल्याचे ती यानिमित्ताने आठवण करून देते. आपल्या पोस्टमध्ये तेजस्वीनी आईचे कौतुक करताना म्हणते की,”‘मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने’ ज्योती चांदेकर ( आईला ) गौरवण्यात आले. 50 वर्षाची कारकीर्द ! अत्यंत कष्टाने साधलेला दीर्घ कला प्रवास आईच्या व्यग्र schedule मुळे तिचा सहवास आम्हाला मुली म्हणून खूप उशीरा मिळाला, आईच्या हाताची चव आम्ही पहिल्यांदा वयाच्या 16 व्या वर्षी चाखली…

अश्या “आई सोबत असण्याचे” अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत. पण ह्याची अजिबात तक्रार नाही…कारण आमची आई आमचं घर संभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन , अनेक बलिदानं देऊन स्वतः चं अस्तित्व घडवत होती ! आणि आज तिला हा मानाचा पुरस्कार स्विकारताना बघून हा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो. बाबा असता तर आईला हा पुरस्कार स्विकारताना तिचा आनंद द्विगुणित झाला असता ! कारण तिच्या ह्या यशामध्ये त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीलया पेलली…आईच्या डोळ्यात समाधानाचे ,आनंदाचे अश्रू बघून तिचा वारसा मी पुढे चालवते आहे, त्याची जबाबदारी कळत नकळत खूप मोठी आहे आणि ती माझ्यावर आहे ह्याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच अत्यंत उत्तुंग कलाकाराची मी लेक आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.