मराठी बिग बॉसचा चौथा सिजन सुरू होऊन आता जवळपास ५५ दिवस पूर्ण झाली आहेत. या ५५ दिवसांत बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते मात्र ह्या स्पर्धकांना प्रेक्षकांची मनं जिंकता आली नव्हती. घरात अनेक वादविवाद घडले , भांडणं देखील झाली मात्र तरीही प्रेक्षकांनी या शोकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. मात्र रविवारच्या दिवशी विशाल निकम, राखी सावंत, आरोह वेलणकर आणि मीरा जगन्नाथ यांची धमाकेदार एन्ट्री झाली. विशाल आणि राखीच्या एंट्रीने शोला खरा रंग चढणार अशी आशा प्रत्येकालाच वाटू लागली. बिग बॉसच्या घरात राखी सावंत हिने एन्ट्री घेताच आपल्या नावाची पाटी तिने एक नंबरवर लावली. या जागेवर सर्वात आधी तेजस्विनीने तिच्या नावाची पाटी लावली होती मात्र आपल्या नावाची पाटी राखी सावंतने का काढली यावरून तेजस्विनीने आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.

तेजस्विनीने बिग बॉसला सूचक विधान करत राखी सावंतची पाटी हटवली आणि मी माझी पाटी तिथे लावणार असा स्टॅण्ड घेतला. अर्थात तिचा हा स्टॅण्ड योग्यच होता मात्र तरीही यामुद्द्यावरून राखीने तिच्यासोबत वाद घातला. तेजस्विनीचा हात फ्रॅक्चर झाला होता त्यावेरून राखीने तिचा दुसरा हात मोडेल असे विधान केले होते. तेजस्विनी ही बिग बॉसच्या घरात दाखल होणारी पहिली सदस्य आहे. त्यामुळे तिने याबाबत स्टॅण्ड घेणं हे अगदीच योग्य होतं असं प्रेक्षकांचं देखील म्हणणं आहे. तेजस्विनीचा हाच स्वभाव प्रेक्षकांना भावलेला आहे. संचालक असतानाही तेजस्विनीने ती जबाबदारी अतिशय समजूतदारपणाने घेतली होती. कुठलाही आरडा ओरडा न करता सदस्यांना फेअर काय अनफेअर काय या गोष्टी सांगताना दिसली. प्रत्येक टास्क खेळताना देखील ती शिस्तबद्ध होती. उगाच अंगावर धावून जाणे, शिव्या देणे अशा गोष्टी तिने कधीच आचरणात आणल्या नाहीत. अमृता सोबत तिची खास मैत्री झाली मात्र जेव्हा किरण माने यांनी तेजस्विनीला पहिला क्रमांक दिला तेव्हा अमृता धोंगडे तिच्यावर रागावली. पण तरीही तेजस्विनी अतिशय शांतपणे तिला समजावत होती. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या सिजनच्या विजेत्याच्या यादीत तेजस्विनीचे नाव असावे असे प्रेक्षकांना वाटू लागले. मात्र तेजस्विनीने बिग बॉसच्या घरातून आता काढता पाय घेतलेला पाहायला मिळत आहे.

एका टास्कमध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र हाताची वेदना वाढू लागल्याने तिला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले जात आहे. विश्रांतीच्या कारणास्तव तेजस्विनीने बिग बॉसचे घर सोडले आहे अशी बातमी सध्या व्हायरल होत आहे. अर्थात ती बिग बॉसचा शो सोडून गेलेली नाही अशीही माहिती देण्यात येत आहे. विश्रांतीनंतर तेजस्विनी पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होईल असा विश्वास प्रेक्षकांना आहे. खेळातून माघार घेणे हे अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या वृत्तीत नाही आणीनंती तसे करणारही नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला विश्रांतीची सक्त ताकीद दिल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे असे म्हटले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशीही देण्यात येते की तेजस्विनीला विश्रांतीसाठी सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे आणि ती बिग बॉसच्या घरात पुन्हा दाखल होणार अशीही बातमी दिली जात आहे तूर्तास अभिनेत्री तेजस्विनी लोणारी या दुखण्यातून लवकरच बरी होवो हीच अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.