मार्तंड जामकरांच्या येण्याने देवमाणूस २ या मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. मार्तंड जामकरच डॉक्टरला पकडू शकतो असा विश्वास प्रेक्षकांना वाटत आहे. ही भूमिका मिलिंद शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाने चोख बजावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरला त्याच्या कटकारस्थानात कोण कोण मदत करतं याचा तपास जामकर करताना दिसत आहेत. त्यासाठी डिंपलवर ते लक्ष्य देऊन आहेत. दोन दिवसांपूर्वी जामकरांनी डॉक्टर आणि डिंपलला साग्रसंगीत भोजनाचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी जामकरांनी दिल चीज क्या है गाण्यावर त्यांच्या स्टाईलमध्ये नृत्य सादर केले त्यांचे हे नृत्य पाहून प्रेक्षक मात्र जामकरांवर पुरते खुश झालेले आहेत. या मालिकेत त्यांना ‘कंगणी कंगणी’ हा डायलॉग दिला आहे. त्यांचा हा डायलॉग ‘तांबडे बाबा’ प्रमाणे चांगलाच हिट झालेला आहे.

एकीकडे जामकर आपल्यावर नजर ठेवून आहेत तर आमदार मॅडम जमीन मिळवण्यासाठी कुठल्याही ठरला जात आहेत हे डॉक्टर आणि डिंपलला कळून चुकले आहे. त्यामुळे मधूच्या जमिनीचा व्यवहार लवकरात लवकर व्हावा अशी त्यांची ईच्छा आहे. आणि त्यासाठीच आमदार मॅडमची ते भेट घेऊन ही डील पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. मालिकेत आमदार मॅडमची नव्याने एन्ट्री झाली आहे. मात्र ही मॅडम आपल्याही पुढची निघाली आहे असे डॉक्टरला समजले आहे. गुंडांच्या मदतीने या मॅडमने डॉक्टर आणि डिंपलला धमकावले आहे. मालिकेत आमदार मॅडमची भूमिका ‘तेजस्वीनी लोणारी’ हिने साकारली आहे. तेजस्विनी लोणारी ही चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आहे. तेजस्वीनीची आई नीलिमा लोणारी या दिग्दर्शिका आहेत तर वडील आर्मीमध्ये होते. तेजस्वीनी मूळची नाशिक जिल्ह्यातील येवल्याची मात्र तीचा जन्म पुण्याचा आणि पुण्यातच तिचे संपूर्ण शिक्षण झाले. वयाच्या ८ व्या वर्षापासूनच तेजस्विनीने दिवाळीच्या लोकल ऍडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ‘नो प्रॉब्लेम’ या मराठी चित्रपटातून तेजस्विनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. दोघात तिसरा आता सगळं विसरा, चिनी, वॉन्टेड बायको नं १, गुलदस्ता, साम दाम दंड भेद, मधू इथे आणि चौघे तिथे, चित्तोड की राणी पद्मिनी का जौहर, बर्नि, बाप रे बाप डोक्याला ताप अशा चित्रपट आणि हिंदी मालिकेतून काम केले. मकरंद अनासपुरेसोबत तिला तब्बल ५ चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. तेलगू तसेच कन्नड चित्रपटात देखील तिला अभिनयाची संधी मिळाली होती.

तेजस्विनी लोणारी ही सोशल वर्कर देखील आहे अभिनय क्षेत्रात सक्रिय असण्यासोबतच तिला भटक्या प्राण्यांविषयी आत्मीयता आहे.’चतुर्थी अॅनिमल फाउंडेशन या संस्थेतर्गत भटक्या प्राण्यांची ती काळजी घेताना दिसते त्यांना कुठली ईजा झाली असेल तर लोकमदतीतून त्यांच्यावर उपचार देखील करते. त्यामुळे एक अभिनेत्री असण्यासोबतच एक सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती अशीही तिची ओळख निर्माण होत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेजस्वीनी आता देवमाणूस २ मालिकेतून छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिची भूमिका आमदार मॅडमची आहे मात्र या आमदार मॅडमला डॉक्टर आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होईल की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल तूर्तास या नव्या मालिकेनिमित्त तेजस्विनी लोणारीचे अभिनंदन आणि शुभेच्छा!.