अग्गबाई सासूबाई या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की यांची जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. मालिकेत या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यामुळे मालिका संपल्यावरही त्यांच्या चाहत्यांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित पाहायला मिळो अशी आशा व्यक्त केली होती. तेजश्री प्रधान आणि तिची मैत्रीण कीर्ती शिंपी या दोघींनी मिळून काही दिवसांपूर्वीच “टेक ड्रीम्स” या निर्मिती संस्थेची सुरुवात केली. या निर्मिती संस्थेतून ‘संरक्षक देवदूत’ या लघुपटाची निर्मिती त्यांनी केली आहे.

१५ ऑगस्ट च्या दिवशी बऱ्याचशा शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातील संरक्षक देवदूत या शॉर्टफिल्मचे मोठे कौतुक केले जात आहे. ही शॉर्टफिल्म पोलिसांच्या जीवनावर भाष्य करणारी आहे. कुठली आपत्ती येवो अथवा कुठले संकट वेळोवेळी हे पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य बजावताना दिसतात. पोलीस आपले मित्र आहेत त्यांचताबाबत समाजात अनेक अफवा गैरसमज पसरलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा पर्यायाने त्यांच्या कामाची दखल घेतली जावी हा हेतू मनात ठेवून आशुतोष पत्कीने ही संकल्पना तेजश्रीपुढे मांडली होती. तेजश्रीलाही ही संकल्पना खूपच आवडली आणि आपल्या निर्मिती संस्थेतून त्याची निर्मिती करण्याचे ठरवले. शिवाय आशुतोषला प्रथमच दिग्दर्शन करण्याची संधीही दिली. संरक्षक देवदूत या शॉर्टफिल्मचे लेखन तेजश्री प्रधानचे असून प्रमुख भूमिकेत जयवंत वाडकर आणि आशिष गाडे या कलाकारांना झळकण्याची संधी मिळाली आहे. या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून आशुतोष आणि तेजश्री पुन्हा एकत्रित आले आहेत. त्यांच्या ह्या पहिल्या वहिल्या शॉर्टफिल्मचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. शिवाय प्रेक्षकांकडून देखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.