आशिक बनाया, भागम भाग, चॉकलेट, ढोल अशा काही मोजक्या बॉलिवूड चित्रपटात झळकलेली तनुश्री दत्ता मी टू प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. २००८ साली हॉर्न ओके प्लिज या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी छेड काढली असल्याचे आरोप तिने त्यांच्यावर लावले होते. मात्र या प्रकरणातून नाना पाटेकर यांना क्लिनचिट मिळाली होती. तानुश्रीच्या खुलास्यानंतर बॉलिवूड सृष्टीत मी टू ची चळवळ जोर धरताना दिसली होती. मिटू प्रकरणामुळे अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे करत मोठमोठ्या सेलिब्रिटींवर लैंगिक छळ केल्याचे आरोप लावले होते. मध्यंतरी नाम फाउंडेशन अंतर्गत पैसे लाटल्याचे मोठमोठे घोटाळे केले असल्याचे तानुश्रीने म्हटले होते. नुकतेच तानुश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यातून तिने मला काही झाले तर नाना पाटेकरच त्याला जबाबदार असतील असे म्हटले आहे.

सध्या तनुश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. त्यात ती म्हणते की, ‘मला कधी काही झाले तर कळू द्या की me too चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि साथीदार आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! कोण आहेत बॉलीवूड माफिया?? एसएसआर मृत्यू प्रकरणात ज्यांची नावे वारंवार आली तेच लोक. (लक्षात घ्या की सर्वांचे फौजदारी वकील समान आहेत) त्यांचे सिनेमे पाहू नका, त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका आणि दुष्ट सूडबुद्धीने त्यांचा पाठलाग करा. माझ्या आणि PR लोकांबद्दल खोट्या बातम्या देणार्या उद्योगातील सर्व चेहरे आणि पत्रकारांच्या मागे जा.सगळ्यांच्या मागे जा!! त्यांचे जीवन नरक बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला! कायदा आणि न्याय माझ्यासाठी अपयशी ठरला असेल पण माझा या महान राष्ट्राच्या लोकांवर विश्वास आहे.जय हिंद…आणि बाय! फिर मिलेंगे…’ अशी सणसणीत टीका करणारी पोस्ट तानुश्रीने शेअर केली आहे. बॉलिवूड सृष्टीतील जे जे कलाकार नाना पाटेकर यांच्या बाजूने आहेत त्या सर्वांवर बहिष्कार घाला त्यांचे चित्रपट पाहणे बंद करा असेच तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.