हिंदी सृष्टीतील कलाकारांची मुलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल होताना दिसतात. मात्र मराठी सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांची मुलं या गोष्टीला अपवाद ठरली आहेत. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये आपले स्थान कायम राखून ठेवले आहे. मालिकेतील माधवी कानिटकर म्हणजेच माईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिने साकारली आहे. सुप्रिया पाठारे यांनी मराठी सृष्टीत आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सतत रडणाऱ्या भूमिकेपेक्षा खलनायिका आणि विनोदी भूमिकेत त्या जास्त रमतात.

‘फु बाई फु’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘मोलकरीणबाई’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘चि. व चि. सौ कां’, ‘बाळकडू’ अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रिया पाठारे यांनी मराठी सृष्टीला एक भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल त्या फारशा कधी बोलताना दिसत नसल्या तरी त्यांची धाकटी बहीण अर्चना नेवरेकर मराठी चित्रपट सृष्टीत चांगल्या स्थिरस्थावर झाल्या होत्या. बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले असताना त्यांनी आर्थिक हातभार म्हणून दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी केली होती. तो काळ बराच मागे लोटला असला तरी त्या आठवणींच्या कोपऱ्यात अजूनही तशाच जपून आहेत असे त्या म्हणतात. मोठ्या हिमतीने आणि कष्टाने या दोघी बहिणींनी मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली मात्र त्यांचा मुलगा मिहीर पाठारे याने अभिनय क्षेत्रात येण्यापेक्षा आपल्या आवडत्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. मिहीर हा शेफ आहे. संजीव कपूर यांच्या खाना खजाना या शोमध्ये त्याने पार्टीसिपेट केले होते. काही काळ तो अमेरिकेत देखील शेफ म्हणून कार्यरत होता. मिहीर आता मायदेशी परतला आहे आणि नुकतेच त्याने स्वतःचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे.

‘मharaj’ असं त्याच्या या हॉटेल व्यवसायाचं नाव असून त्यात खवय्यांना त्याच्या हातची स्पेशल पावभाजी चाखायला मिळणार आहे. १४ जुलै रोजी त्याच्या या व्यवसायाची सुरुवात झाली असून मराठी सेलिब्रिटींनी मिहिरला शुभेच्छा दिल्या आहेत. ठाण्यातील खाद्यप्रेमींसाठी ही खूश खबर ठरली आहे. मिहीर पाठारे आणि त्याचा मित्र आदेश या दोघांनी ठाण्यात ‘मharaj’ ह्या नावाचा फूड ट्रक सूरु केला आहे. ह्या दोघांनी ग्राहकांच्या आवडी निवडी जाणून वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या राईस आणि पाव भाजीचा फूड ट्रक मध्ये समावेश केला आहे. ग्ल्याडी अलवारीस रोड, खेवरा सरकल, ठाणे पश्चिम येथे हा व्यवसाय त्याने थाटला आहे. मिहिर पाठारे आणि आदेश याला या नव्या व्यवसायाच्या भरभराटी साठी मनःपूर्वक शुभेच्छा!.