मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये सोनाली पाटील हिने सहभाग दर्शवला होता. या शोमुळे सोनालीचे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. नुकतेच सोनालीने गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनालीचा भाऊ पुण्यात राहतो मात्र रात्रीच्या प्रवासात त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग तिने यावेळी सांगितला आहे. सैराट चित्रपट फेम सल्या म्हणजेच अरबाज शेख याने काल पुण्यातील अशाच मुजोर रिक्षा वाल्याचा कारनामा सांगितला होता. पुण्यातील त्या रिक्षाचालकाचा नंबर फोटो सहित शेअर करून कशी लूटमार केली जाते हे उघड केले होते.

अरबाज पाठोपाठ आता सोनाली पाटीलने देखील पुण्यातील रिक्षाचालकाचा एक कारनामा उघडकिस आणला आहे. या घटनेची माहिती देताना सोनालीने तिच्या चाहत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. काल सोनाली पाटीलच्या भावाचा वाढदिवस होता त्यासाठी तो कोल्हापूरला आपल्या गावी गेला होता. अभिजित पाटील हे त्याचं नाव. वाढदिवस साजरा झाल्यानंतर तो पुण्याला परत आला. तो स्वारगेटला उतरला आणि तिथून तो हडपसरला जाण्यासाठी ओला बुक करत होता. मात्र रात्री १२ ते १ च्या दरम्यान खूप पाऊस होता शेवटी कंटाळून त्याने एक रिक्षा पकडली. स्वारगेट ते हडपसर यादरम्यान काँटनमेंट एरियात खूप वर्दळ नसते त्याठिकाणी रिक्षाचालकाने त्याची रिक्षा थांबवली. रिक्षा थांबताच अजून त्याचे तीन साथीदार तिथे दाखल झाले. आणि हे चौघे मिळून सोनालीच्या भावाकडून मोबाईल, पाकीट, सोन्याची साखळी अशा काही किमती वस्तू हिसकावून घेऊ लागले. सोनालीचा भाऊ देखील त्या चौघांना प्रतिकार करत होता मात्र काही गाड्या येण्याचा आवाज आला तसा या चौघांनी तिथून पळ काढला. झटापटीत मोबाईल, पैसे आणि किंमती वस्तू हिसकावून घेण्यात त्यांना यश मिळाले.

या झटापटीत सोनालीच्या भावाला थोडीशी दुःखापत झाली. मात्र त्याचा जीव वाचला हे खूप महत्त्वाचं होतं असे ती आवर्जून म्हणते. तिचा व्हिडीओ बनवण्याचा मुख्य उद्देश हाच होता की कोणीही रात्रीचा प्रवास करत असतील तर त्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. आम्ही या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे ही सर्व प्रोसेस आज दुपारी आम्ही पूर्ण केली असे ती म्हणते. कोल्हापूरमध्ये जर रात्री कोणी मुलगी प्रवास करत असेल तर तिथले रिक्षाचालक तिची स्वतः जबाबदारी घेऊन तिला सुखरूप घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात मात्र अशा गोष्टी सगळीकडेच होतात असे नाही . बरीचशी शहरं अशी आहेत की जिथले ऑटो वाले प्रवाशांना खूप चांगली वागणूक देतात. मात्र काही ठिकाणी खूप धक्कादायक प्रकार घडत असतात. प्रसिद्धी साठी मी हा व्हिडीओ बनवला नसून प्रवास करताना सर्वांनीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे असाच सल्ला तिने यातून दिलेला आहे.