जरा हटके

सोनाली कुलकर्णी सोबत डान्स करणारा हा रांगडा कलाकार आहे खूपच खास

सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडीओ बनवून अनेकांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशातच डोक्यावर गांधी टोपी आणि पांढरेशुभ्र धोतर नेसून ग्रामीण ढंगातील नृत्यशैलीमुळे सोशल मिडिया स्टार बनलेल्या विक्रम आल्हाट यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच नव्हे तर मराठी सृष्टीतील कलाकार तसेच साता समुद्रापार असलेल्या डेव्हिड वॉर्नर सारख्या क्रिकेटरला देखील भुरळ पाडली आहे. सोशल मीडिया स्टार असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या या रांगड्या गड्याने इन्स्टाग्रामवर अनोख्या शैलीत नृत्याचे व्हिडीओ शेअर करून ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स बनवले आहेत. इन्स्टग्रामवर प्रसिद्धी मिळवण्यागोदर विक्रांत टिकटॉकच्या माध्यमातून स्टार बनला होता. मात्र चीनशी तणाव झाल्यानंतर भारतात टिकटॉक बॅन करण्यात आले त्यावेळी विक्रांत समोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते.

dancer vikram alhat
dancer vikram alhat

मात्र लहानपणापासूनच खरतर प्रसंगातून वाट काढणाऱ्या विक्रांतसाठी हे आव्हान नक्कीच कठीण नव्हते. विक्रांत करमाळ्यातच लहानाचा मोठा झाला. विक्रांत ७ वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. या तिन्ही भावंडांना त्यांच्या थोरल्या बहिणीने सांभाळले. आईचे छत्र हरवल्याने घरची संपूर्ण जबादारी त्यांच्या मैनाताईंवर येऊन ठेपली. भावंडांना सांभाळता यावे म्हणून त्यांच्या बहिणीने दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी केली, रात्रीचे शिल्लक राहिलेले अन्न आणून भावंडांची पोटं भरली. या कठीण प्रसंगात ही ताई तीन लेकरांची आईच बनून त्यांचा सांभाळ करू लागली. कपड्या लत्त्याची हौस नाही ना कधी नटण्याचा मोह झाला नाही अशा या ताईने स्वतःच्या लग्नाचा देखील त्याग केला. बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले असले तरी विक्रांतला शिकण्याची हौस होती. सोलापूर युनिव्हर्सिटीमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. करमाळा येथे एका दवाखान्यात तो कंपाउंडरम्हणून काम करतो मात्र त्याच्या प्रसिद्धीमुळे काही लोक त्याला तिथे डॉक्टर म्हणूनच ओळखू लागली आहेत. सोलापूर विद्यापीठात शिक्षण घेत असताना नृत्याची विशेष आवड असल्याने युथ फेस्टिव्हल मध्ये त्याने सहभाग दर्शवला होता. मात्र विक्रांतने सुचवलेल्या डान्सच्या नवनवीन आयडिया, स्टेप्स मुळे कोच आणि कोरिओग्राफर त्याला जाणूनबुजून टाळायचे. पटत नसतानाही केवळ त्यांना बक्षीसं मिळवून देण्यासाठी विक्रांत गप्प बसून राहायचा. कॉलेजमधील मित्रांच्या प्रोत्साहनामुळे तो सोलापूरला होणाऱ्या स्पर्धेत सहभागी झाला.

vikram alhat dancer
vikram alhat dancer

त्याने केलेल्या डान्सला विदाऊट प्रॅक्टिस टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात वन्स मोअर मिळाला. कॉलेजमध्ये असताना कोरिओग्राफरचा इगो, प्राध्यापकांची अंतर्गत खुन्नस यामुळे कलाकारांची गळचेपी झाली. यातून मार्ग काढत विक्रांतने टिक टॉकसारख्या खुल्या मंचावरून स्वतःची ओळख निर्माण केली. आज त्याने आपल्या गावरान तडकाबाज नृत्य शैलीने लाखो चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. महाराष्ट्राचा युवा स्टार या पहिल्या पर्वाचा ‘पॉवर हाऊस परफॉर्मर’ होण्याचा पहिला मान विक्रांतला मिळाला आहे. डेव्हिड वॉर्नर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख यांनीही विक्रांतच्या नृत्याचे विशेष कौतुक केले आहे. या यशस्वी प्रवासामागे एक खडतर प्रवास आहे याची जाणीव विक्रांतला कायम सतावते. अजूनही विक्रांत आपल्या कुटुंबासोबत एका साध्या पत्र्याच्या खोलीतच राहतो. आईच्या पश्चात आपल्या ताईने केलेला त्याग खूप मोठा आहे याची जाणीव ठेवून तो पुढचा जन्म ताईच्याच पोटी येऊ दे असे तो आवर्जून म्हणतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button