कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. नुकतेच या दिवसाचे औचित्य साधून तमाम मराठी कलाकारांनी देखील आपल्या सोशल अकाउंटवरून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील एका हटके अंदाजातून शुभेच्छा दिल्या त्यात तिने म्हटले की, न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!…’

अभिनेत्री सोनालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी तिच्या प्रमाण भाषेवर कौतुकाची स्तुती सुमनं उधळली आहेत तर काहींनी टीका करत तिला धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. यातून किरण माने यांनी केलेली कमेंट मात्र बहुतेकांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली आहे. किरण माने नेहमी आपल्या सोशल अकाउंटवर हटके अंदाजात पोस्ट लिहीत असतात. त्यांच्या लिखाणात गावरान भाषेचा बाज पाहायला मिळतो म्हणूनच त्यांच्या लिखाणाची तुलना व्याकरणाशी न केलेलीच बरी. मात्र अशा पद्धतीने लिखाण करून त्यांनी त्यांचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोनालीच्या पोस्टवर परखडपणे मत व्यक्त करताना किरण माने म्हणतात की, ‘उच्चार चुकवणार यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायमनला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नाट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय.

सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची.’ किरण माने यांनी लिहिलेल्या या कमेंटवर अनेकांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान सोनाली कुलकर्णी हिने आपली ही मराठी भाषा दिनानिमित्त लिहिलेली पोस्ट फेसबुकवरून लगेचच हटवली आहे. तिने असे का केले यामागचे नेमके कारण समजले नसले तरी तिच्या चाहत्यांनी तिला प्रमाण भाषेवरून प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रात अंतरा अंतरावर भाषा बदलत जाते. बोलीभाषेतून सांगणाऱ्याला त्याचा मुद्दा पटवून देता आला की ती त्याची बोलीभाषा प्रमाण मानली जाते. अर्थात यात व्याकरणाच्या होणाऱ्या चुकांना ग्राह्य धरले जात नाही. जर अशा चुकांना थोपवण्यात येऊ लागले तर भाषेला मर्यादा येतील आणि यातूनच बोली भाषेचे मोठे नुकसान होईल.