जरा हटके

माझ्या बाबांचा मला अभिमान आहे म्हणत सोनाली कुलकर्णीने कारगिल दिनी शेअर केली पोस्ट

१९९९ सालच्या २६ जुलै या दिवशी भारताच्या नावावर एक विजय दिवस म्हणून कोरला गेला. १९ मे १९९९ पासून सुरू झालेल्या युध्दाचा २६ जुलै रोजी भारताच्या विजयाने अंत झाला. भारत पाकिस्तान सीमारेषेवरील कारगिल या जिल्ह्यात हे युध्द सुरू होतं. या युध्दात अनेक सैनिक शहिद झाले. पण त्यांनी देशाला विजयश्री बहाल केली. आज या घटनेला २३ वर्षे झाली. २६ जुलै हा दिवस कारगिल दिवस म्ह्णून देशभरात साजरा केला जातो. प्रत्येकजण या दिवसाची आठवण ठेवून सैनिकांना, शहिदांना सलाम करतो. अशा सामाजिक विषयावर कलाकारही नेहमीच व्यक्त् होत असतात. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आजच्या कारगिल विजयदिनी शेअर केलेली पोस्ट वेगळी ठरली आहे ती तिने वडिलांविषयी व्यक्त केलेल्या अभिनामाच्या निमित्ताने.

actress sonalee kulkarni family
actress sonalee kulkarni family

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनय आणि नृत्याने ओळख निर्माण करणारी सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर हे सैन्यदलातील वैद्यकीय विभागातून निवृत्त झाले आहेत. सोनाली नेहमीच तिच्या अनेक मुलाखतींमध्ये वडिलांविषयी भरभरून बोलत असते. सोनालीचा जन्मही पुण्यातील लष्करी छावणीतच झाला आहे. लहानपणापासून तिने वडिलांच्या डोळ्यात देशासाठीचा अभिमान पाहिला आहे. सोनालीची आई सविंदर या पंजाबी असून वडील सीमेवर कर्तव्य बजावत असल्याने आईच्या तालमीतच सोनालीने अनेक गोष्टी शिकल्या आहेत. सोनाली लहान असताना तिच्या वडिलांकडून शौर्याच्या गोष्टी ऐकायची. वडीलांच्या बदलीमुळे लहानपणी सोनालीने लष्करी कुटुंबात राहण्याचा अनुभव घेतला आहे. वडीलांकडून युध्दाच्या कथा, सैनिकांचा पराक्रम ऐकताना तिच्या बाबांविषयीही तिला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. त्यामुळेच आजच्या कारगिल विजयी दिनीदेखील सोनालीने , मला बाबांचा अभिमान वाटतो असं म्हणत तिच्या इन्स्टापेजवर पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने वडीलांचा लष्करातील जुना फोटो पोस्ट केला आहे. वडिलांप्रमाणेच कारगिल युध्दात आपले शौर्य गाजवणाऱ्या, प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांमुळेच आपण आजचा दिवस पाहू शकलो असंही सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

sonali kulkarni father
sonali kulkarni father

सोनालीच्या या पोस्टवर अनेकांना कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी सोनाली तुझ्या वडिलांचा आम्हालाही अभिमान आहे अशी कमेंट केली आहे. तर तिच्या काही चाहत्यांनी असं म्हटलं आहे की सोनाली तू खूप भाग्यवान आहेस की तू एक सैन्यदलातील योध्द्याची मुलगी आहेस. आज सगळीकडे देशभरात कारगिल दिवस साजरा केला जात आहे. ज्या सैनिकांनी या युध्दात प्राण गमावले त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. अशा वातावरणात सोनालीने तिचे वडील आणि सर्व सैनिकांसाठी व्यक्त केलेल्या भावनांमुळे तिचं कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसात सोनाली तिच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. पांडू, तमाशा लाइव्ह या सिनेमांनी सोनालीच्या अभिनयाचा डंका वाजवला आहेच. लवकरच सोनाली डान्स रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून अभिनेता गश्मीर महाजनी याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. मनोरंजन विश्वातील व्यस्ततेतही कारगिल विजयीदिनी सैन्यदलात कार्यरत असलेल्या वडीलांसह सर्व सैनिकांसाठी पोस्ट शेअर करत त्यांना सलाम करणाऱ्या सोनालीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button