देवमाणूस २ या झी मराठी वरील मालिकेला वेगळे वळण मिळाले आहे. आमदार देवयानी गायकवाड मॅडमनी डॉक्टरला डिंपलच्या नावे असलेल्या जमीनिला तब्बल १० कोटींची ऑफर देऊ केली आहे. या पैश्याच्या मोहामुळे डॉक्टर आणि डिंपल आमदार मॅडमच्या जाळ्यात तर ओढले जाणार नाही ना अशी शंका मालिकेच्या प्रेक्षकांना आहे. तर तिकडे इन्स्पेक्टर जामकर डॉक्टरच्या हात धुवून मागे लागला आहे. मागच्यावेळी आमदार बाईंमुळे डॉक्टर जेलमधून सुटला होता मात्र आता आमदार बाईंच्या मिरवणुकीतच डॉक्टरांनी एक नाही, दोन नाही, चार नाही तर ३८ खून मी केलेत असा गौप्यस्फोट करून दिला आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर जामदार आता डॉक्टरला पुराव्यानिशी कसे पकडतात याची अधिक उत्सुकता आहे.

आता या जामकरांच्या मदतीला येणाऱ्या पात्राची म्हणजेच मार्तंड जामकरच्या पत्नीची मालिकेत लवकरच एन्ट्री होणार आहे. हे पात्र निभावणार आहे चला हवा येऊ द्या फेम विनोदी अभिनेत्री स्नेहल शिदम. स्नेहल शिदम आता देवमाणूस २ या मालिकेचा महत्वाचा भाग असणार आहे. डॉक्टर अजितकुमार देव आणि डिंपलकडून सत्य काढून घेण्यासाठी ती जामकरला मदत करणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तूर्तास तिच्या एंट्रीने मात्र मालिकेला रंजक वळण नक्कीच मिळणार याची खात्री आहे. स्नेहल शिदम ही ‘चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल’ या पर्वाची विजेती ठरली होती. या विजयामुळे चला हवा येऊ द्या या मंचाची आणि थुकरटवाडीचा ती एक महत्वाचा घटक बनली आहे. या मंचावर आता तिच्या नसण्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही इतकी ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मात्र आता स्नेहलची देवमाणूस २ मालिकेत एन्ट्री झाल्याने तिने चला हवा येऊ दया मधून काही काळासाठी ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. खरं तर चला हवा येऊ द्या या शोमुळेच तिला अनेक मालिकेतून अभिनय साकारण्याची संधी मिळाली आहे. माझा होशील ना, भागो मोहन प्यारे यासारख्या मालिकेतून तिला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या होत्या. कॉलेजमध्ये असल्यासपासूनच स्नेहल एकांकिका, नाट्यस्पर्धामधून अभिनय साकारत असे.

एक संधी म्हणून चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल मध्ये सहभागी होण्यासाठी तिने ऑडिशन दिली होती आणि तिने सर्व स्पर्धकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने या शोचे विजेतेपद देखील पटकावले होते. स्नेहलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास फारच उल्लेखनीय ठरला आहे मात्र या प्रवासात अनेक अडथळे पार करत तिने यशचे शिखर गाठले आहे. आपल्या दिसण्यावरून, रंगावरून जवळच्याच व्यक्ती नावं ठेवतात तेव्हा खूप वाईट वाटते असे स्नेहल एका मुलाखतीत म्हणाली होती. मात्र ह्या सर्व गोष्टी दूर करत तिने आपले ध्येय्य गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यातूनच मार्ग कुठून तिने आज तमाम प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. देवमाणूस २ या मालिकेत डॉक्टर आणि डिंपलचे कटकारस्थान लवकर उघडकीस यावे अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर प्रेक्षकांची ही ईच्छा नक्किच पूर्ण करणार अशी एक आशा आहे. आता यात त्याला त्याच्या पत्नीची देखील साथ मिळणार का हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे. या नवीन भूमिकेसाठी स्नेहल शिदमला खूप खूप शुभेच्छा.