
नाती गोती, जोगवा, इट्स ब्रेकिंग न्यूज, देऊळ, तुकाराम, ७२ मैल एक प्रवास, कॅण्डल मार्च, महागुरू, लाठी, परतु, बायोस्कोप, गणवेश, सावट यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये स्मिता तांबे हिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर सिंघम रिटर्न्स, रुख, नूर, डबल गेम, पंगा यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. स्मिता ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये सहभागी झाली होती. हिंदी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका असा तिचा प्रवास चालू असताना २०१९ साली स्मिता ही धीरेंद्र द्विवेदी यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. लग्नानंतर उत्तर भारतात असलेल्या तिच्या सासरी स्मिताचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.

लग्नानंतर स्मिताने पहिल्यांदाच तिच्या घरी गौरिंचे पूजन देखील केलेले पाहायला मिळाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मिता सासरकडच्यांचे आणि तिथल्या संस्कृतीचे नेहमीच कौतुक करताना दिसते. गेल्या वर्षी आदिती सारंगधर, फुलवा खामकर, अमृता संत , रेशम टिपणीस यांनी स्मिताचे डोहाळजेवण मोठ्या थाटात साजरे केले होते त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये स्मिता आणि धीरेंद्र यांना कन्यारत्न प्राप्ती झाली होती. वैदिका असे तिने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ठेवले होते. वैदिका आता येत्या काही दिवसात एक वर्षाची होत आहे. स्मिता तिच्या लेकीचे म्हणजेच वैदिकाचे क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. अशातच तिने तिचे मजेशीर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांकडून हजारो लाईक्स मिळवले आहेत. वैदिकासाठी जितेंद्र जोशीने एक छानशी कविता लिहिली होती. “तुला येतं का ऐकू मी हसताना सांग कूस बदलून ऊर समजतो का मी पळताना सांग पाय हलवून तुला कळतं का घर येई ओठी थर थर बेंबी तून भरभर लाल लाल सरसर पोटा आत तुझं पोट सुद्धा भरतं का सांग गुदगुल्या करून माझा जीव तुझा श्वास माझे डोळे तुझी आस माझी जीभ तुझी चव चल झोप आता बास डोळ्या आत डोळे गात स्वप्नं पडतं का सांग स्वप्नात येऊन” त्याने लिहिलेल्या या कवितेवर स्मिताने आभार व्यक्त केले होते.

अस्मिताच्या मुलीचे म्हणजे वैदिकाचे नाव पती धिरेंद्रनेच सुचवले असल्याचे स्मिताने एका मुलाखतीत सांगितले होते. आम्हाला तिला एक चांगला माणूस म्हणून घडवायचं आहे असे ती वैदिकाबाबत म्हणते. लग्नानंतर स्मिता फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाली नाही. बाबू या चित्रपटात ती झळकली त्यावेळी ती आपल्या लेकीच्या काळजीत थोड्या वेळासाठी शूटिंगला जायची. आता आपल्या लेकीच्या पालनपोषणाची ती जबाबदारी पार पाडत आहे त्यामुळे सध्या तरी ती कोणता प्रोजेक्ट स्वीकारणार नसल्याचे सांगते. सध्या तरी घर संसारात रमलेली स्मिता आपल्या लाडक्या लेकिसोबत वेळ घालवताना दिसते. तिच्या लेकीच्या या बाललीला पाहून सेलिब्रिटींकडून खूप छान छान प्रतिक्रिया तिला मिळत आहेत.