उद्योग क्षेत्रात अनेक नव नव्या संधी उपलब्ध होत असतानाच पर्यावण पूरक उद्योगधंद्याकडे अनेक जणांचा कल वाढलेला पाहायला मिळतो. अशातच शेतकऱ्यांकडील टाकाऊ माल जर कोणी खरेदी करत असेल तर तो विचार शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचाच मानला जातो. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अशाच एका पर्यावरण पूरक आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी उद्योजिका बनली आहे. ही अभिनेत्री आहे सिया पाटील. तिच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी हे सिया पाटीलचे मूळ गाव.

दिवंगत द्राक्ष बागायतदार शंकरराव पाटील यांची ती कन्या. स्वबळावर मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळवलेल्या सिया पाटीलने गर्भ, बोला अलख निरंजन, डोंबिवली रिटर्न, पारख नात्यांची, धूम२ धमाल, गाव थोर पुढारी चोर, चल धर पकड अशा अनेक चित्रपटातून मुख्य तर कधी सहाय्यक भूमिका निभावल्या आहेत. मात्र अभिनयासोबतच सियाचा प्रवास तेवढाच प्रेरणादायी आहे असेच म्हणावा लागेल. कारण केवळ अभिनय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता तिने मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचे सलून आणि हॉटेल व्यवसायास सुरूवात केली आहे. मिलेनियम पॅराडाईज , ठाकूर व्हिलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे तिने ‘S.Sense salon and spa’ सुरु केले असून दोन दिवसांपूर्वीच तिने चांदीवली स्टुडिओ जवळ ‘गाव curry चव महाराष्ट्राची’ या नावाने हॉटेल सुरू केले आहे. गेल्या वर्षी सियाने शिर्डी येथे ‘Shion Green Energy’ हा पर्यावरण पूरक व्यवसाय सुरू केला होता. शेतकऱ्यांना या व्यवसायातून आर्थिक लाभ व्हावा हाच यामागचा मुख्य उद्देश होता. शिर्डी जवळील शिंगवे या गावात तब्बल दोन एकर परिसरात हा प्लांट उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पीक निघून गेल्यावर त्यांच्या शेतात जो पालापाचोळा , कचरा शिल्लक राहतो तो या शेतकऱ्यांना एकतर फेकून तरी द्यावा लागायचा किंवा जाळून तरी टाकावा लागायचा.

परंतु हेच सर्व वेस्ट मटेरियल त्यांच्याकडून विकत घेऊन या प्लांटमध्ये आणला जातो. या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करून कुजवून त्यापासून ब्रिकेट बनवली जाते. ब्रिकेट म्हणजे कचऱ्याच्या भुग्यापासून दाबून केलेली वीट. या पर्यावरण पूरक विटेला मोठमोठ्या इंडस्ट्रीजमधुन मागणी असते. बॉयलर साठी या विटा पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असल्याने या विटांना कोका कोला, हिंदुस्थान युनीलिव्हर लिमिटेड, प्रभात डेअरी, बारामती ऍग्रो अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीकडून मागणी येते. या विटाची साधारण ६ ते ७ हजार रुपये टन याप्रमाणे विक्री केली जाते. सियाला या व्यवसायातून चांगले उत्पन्न तर मिळतेच शिवाय यातून शेतकऱ्यांना देखील आर्थिक फायदा होत असल्याचे ती आवर्जून सांगते. सियाचा बिजनेस पार्टनर आणि भाऊ रोहित वाणी हा या संपूर्ण प्लांटची जबाबदारी सांभाळतो. आपल्या शेतातील माल गेल्यावर राहिलेला पालापाचोळा, कचरा या प्लांटमध्ये नक्की आणा असे इतर शेतकऱ्यांनाही तिने आवाहन केले आहे. या पर्यावरण पूरक व्यवसायानिमित्त सियाचे नक्कीच कौतुक करायला हवे या व्यवसायाला दिवसेंदिवस भरभराटी मिळो हीच एक सदिच्छा.