अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिचा साडी लुक नेहमीच तिच्या चाहत्यांना खुणावतो. नायिका आणि खलनायिका म्ह्णून यशस्वी झाल्यानंतर श्वेतानं निर्मितीक्षेत्रातही लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतेच तिने साडीतील काही फोटो इन्स्टापेजवर शेअर केले आहेत. पण ही साडी तिच्यासाठी खास आहे आणि ती खास व्यक्तीने तिला भेट दिली होती. ती व्यक्ती कोण आहे आणि तिने दिलेली साडी नेसल्यावर श्वेताला नेमकं काय वाटलं हेदेखील तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. आजकाल कलाकार हे काही फक्त त्यांच्या नव्या सिनेमाचे पोस्टर, ट्रेलर, फोटोसेशनचे लुक इतकच शेअर करत नाहीत तर त्यांच्या आयुष्यातील काही भावनिक क्षणही चाहत्यांशी शेअर करत असतात.. अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिनेही अशीच एक आठवण शेअर केली आहे.

मराठी मालिकांमध्ये नायिका आणि खलनायिका साकारून लोकप्रिय झालेली श्वेता शिंदे गेल्या काही वर्षापासून मालिकांच्या निर्मितीत उतरली आहे. लागिरं झालं जी या मालिकेची निर्मिती श्वेतानं केली होती. एका सैनिकाची प्रेमकहाणी या कथेवर बेतलेली ही मालिका खूप गाजली. तर सध्या श्वेताची निर्मिती असलेली देवमाणूस मालिकाही लोकप्रिय आहे. या मालिकेचा पहिला भाग तुफान गाजला होता. लागिरं झालं जी ही श्वेताची निर्माती म्हणून पहिलीच मालिका हिट ठरली. या मालिकेचं शूटिंग साताऱ्यातील एका गावातच झालं. या मालिकेतील कलाकारांशी श्वेताचं खूप छान नातं तयार झालं होतं. या मालिकेतील जीजी म्हणजेच अजिंक्यच्या आजीची भूमिका करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं दोन वर्षापूर्वी निधन झालं. जीजी म्हणजेच कमल ठोके यांनी श्वेताला एक साडी भेट दिली होती. या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की या साडीवर आजच्या आघाडीच्या नायिकांच्या छबी प्रिंट केल्या आहेत. पण काही कारणाने ती साडी नेसायची राहून गेली. दरम्यान कमल यांचं निधन झालं आणि त्यांनी गिफ्ट दिेलेली साडी नेसून दाखवायचं श्वेताच्या मनातच राहिलं. हीच साडी जेव्हा श्वेतानं नुकतीच नेसली तेव्हा तिला कमल यांची खूप आठवण आली. म्हणूनच श्वेतासाठी ही स्पेशल साडी आहे. ही साडी नेसून श्वेतानं काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्वेताने तिच्या इन्स्टापेजवरील पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, आजची ही पोस्ट माझ्यासाठी खास आहे. त्यामागे कारणही तसच आहे…लागिर झालं जी मधील आपल्या सर्वांच्या लाडक्या जीजींनी ही साडी मला गिफ्ट केली होती. ही साडी देताना त्या मला म्हणाल्या होत्या… “एकदा तरी नेसशील ना ही साडी? मला ह्या साडीत पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती. खरतर ही साडी नेसून, छान तयार होऊन मला त्यांच्यबरोबरच फोटोज् काढायचे होते पण तो योग कधी आलाच नाही… त्यापूर्वीच जीजी आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी दिलेली ही साडी आजही मला त्यांच्या मायेची ऊब देते. ही साडी जेव्हा मी नेसले तेव्हा सतत त्या माझ्या आजूबाजूलाच असल्याचा भास मला जाणवत होता. त्यांच्याकडे पाहिलं की नेहमी त्यांच्या डोळ्यात मला माझ कौतुकच दिसायच. मी साताऱ्याची आणि त्या कऱ्हाडच्या असल्यामुळे त्यांना नेहमी माझ्याबद्दल एक वेगळाच अभिमान असायचा आणि दरवेळी त्या हे बोलूनही दाखवत. मी, ही साडी म्हणजे जीजींनी मला दिलेला आशीर्वाद आणि त्यांच्या माझ्यावरील अमाप प्रेमाची आठवण समजते. आणि ती मी नक्कीच आयुष्यभर स्वतःकडे जपून ठेवणार आहे. “जीजी, आज तुम्ही इथे माझ्याबरोबर नाही आहात पण मी नक्कीच सांगू शकते की, तुम्ही जिथे कुठे असेल तिथुन मला पाहत असाल आणि या साडीत मला पाहून तुम्हालाही खूप आनंद होत असेल.”