झी मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या नव्या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ या मालिकेत ती अक्षराचि भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत अभिनेता ऋषीकेश शेलार प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने शिवानीने एक मुलाखत दिली आहे. शिवानी आपल्या सासूला सासूबाई किंवा आई नाही तर चक्क ताई म्हणून हाक मारते याचा खुलासा त्यात केला आहे. गेल्या वर्षी शिवानीने विराजस कुलकर्णी सोबत मोठ्या थाटात लग्न केले होते. त्यांचे हे लग्न सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. आपली होणारी सून कोण आहे हे मृणाल कुलकर्णी यांना अगोदरपासूनच माहीत होते. विराजस आणि शिवानी हे दोघेही कॉलेजपासूनचे चांगले मित्र. नाटकातून एकत्रित काम करत असताना सतत एकमेकांसोबत राहिल्याने लोकांनीच त्यांना कपल म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली.

मित्र मैत्रिणी आणि घरच्यांनी देखील असा समज करून घेतल्याने पुढे या दोघांनी देखील याबाबत विचार केला. दरम्यान विराजस शिवानीला नेहमी घरी घेऊन यायचा तेव्हा दरवेळी हा हिलाच का घरी आणतो? असा प्रश्न मृणाल कुलकर्णी यांना पडायचा. तेव्हा लोकांनीच आमच्या नात्याबद्दल ठरवल्यानंतर आम्ही देखील लग्नाचा निर्णय घेतला असे शिवानी या मुलाखतीत म्हणते. शिवानी आणि मृणाल कुलकर्णी यांनी अनेक प्रोजेक्टमधून एकत्रित काम केलेलं आहे. मृणाल कुलकर्णी या संतूर मॉम असल्याने ती त्यांना सेटवर ताई म्हणूनच हाक मारायची. त्यांच्याकडे पाहून काकू अशी हाक मारणं तिला अजिबात योग्य वाटत नव्हतं. एका चित्रपटात मृणाल कुलकर्णी शिवानीच्या आईच्या भूमिकेत होत्या. सेटवर सगळेचजण त्यांना ताई म्हणायचे तेव्हा शिवानी सुद्धा त्यांना ताई असेच म्हणून हाक मारू लागली. नाटकातही अनेक वर्षे एकत्रित काम केलेलं होत तेव्हा सुद्धा ताई हेच अंगवळणी पडत गेलं. मात्र विराजस सोबत लग्न झाल्यानंतर शिवनीला त्यांना काय म्हणून हाक मारू असा प्रश्न पडायला लागला त्यावेळी ती गप्प राहायची..तेव्हा मृणाल कुलकर्णी यांनीच तिला ‘ तू ताईच म्हण मला काहीच वाटणार नाही’ असे म्हणून त्यांनी आपल्या सुनेला मोकळीक दिली. त्यामुळे आजही कुठे गेलं तरी शिवानी मृणाल कुलकर्णी यांना ताई म्हणूनच हाक मारते तेव्हा लोकांना ते खूप वेगळं वाटतं.

शिवानी कुलकर्णींच्या घरात सून बनून आल्यापासून मृणाल कुलकर्णी आपल्या सुनेवर भलत्याच खुश आहेत. शिवानीने या घरात आल्यापासून सगळ्यांना आपलंसं केलंय अशी कौतुक करणारी एक पोस्ट त्यांनी लिहिली होती. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेली होती. शिवानीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मृणाल कुलकर्णी म्हणाल्या होत्या की, प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय मुलगी असण्याचं सुख ! ‘ घरात एक मुलगी असायला हवी ‘ म्हणजे काय याचा अर्थ आत्ता कळतोय. लगबग , गडबड ,धांदल , हसण्याच्या लकेरी .. विराजसची मैत्रीण ते आमची सून हा प्रवास तू मस्त पार पाडला आहेस. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आम्हाला तुझं कौतुक आहेच ,पण नात्यांमधला गोडवा टिकवण्यासाठी तू नेहेमीच प्रयत्न करतेस हे विशेष महत्त्वाचे.. दोन्ही आज्या तुझ्यावर जाम खूश आहेत ! आपल्या माणसांवर प्रेम करणे आणि ते योग्य पद्धतीने दाखवता येणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ते आयुष्यभर करायचे असते हे नेहेमी लक्षात ठेव.आता हळूहळू तुझं काम सुरू झालंय..प्रत्येक गोष्ट perfect करण्याच्या प्रयत्नात तब्येत सांभाळणं लक्षात ठेव ..diet चा अतिरेक नको ! सगळं खायचं आणि व्यायाम चुकवायचा नाही ! हे वर्ष अनेकार्थानी eventful गेलंय.. अशीच यापुढली ही सारी वर्ष मनाजोगती जाऊदे !