झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात उतरली आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये टॉप १० मध्ये प्रवेश मिळवून ८ व्या क्रमांकावर आपलं नाव नोंदवलं आहे. शिल्पा तुळसकरने अनामिकाचा बिनधास्तपणा आपल्या अभिनयाने सुरेख निभावला आहे. तर स्वप्नील जोशीने साकारलेला साधा भोळा सौरभ पटवर्धन तितकाच भाव खाऊन जाताना दिसत आहे. सुरुवातीला स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर एकत्रित झळकणार म्हटल्यावर अनेकांनी नाराजी दर्शवली होती. शिल्पाच्या ऐवजी मुक्ता बर्वे या मालिकेत हवी होती अशी चर्चा जोर धरताना दिसली.

कारण स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी मालिका तसेच चित्रपटातून काम केले होते त्यामुळे हीच जोडी परफेक्ट जोडी झाली असती असे मत व्यक्त केले जात होते. मात्र कुठेतरी वेगळेपणा हवा म्हणून शिल्पा आणि स्वप्नीलच्या जोडीला काही चोखंदळ प्रेक्षकांनी पाठिंबा दर्शवला होता. शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी प्रथमच या मालिकेतून एकत्रितपणे काम करत आहेत असे नाही. तू तेव्हा तशी या मालिके अगोदर ‘हद कर दि’ या हिंदी मालिकेतून हे दोघेही एकत्रित झळकले होते. फक्त या हिंदी मालिकेत ते आई मुलाची भूमिका साकारताना पाहायला मिळाले. रामणारायन रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतलेल्या शिल्पा तुळसकरने ब्योमकेश बक्षी या हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. शांती, दिल मिल गये, कैसा ये प्यार है, देवो के देव महादेव अशा अनेक हिंदी मालिकेतून शिल्पा तुळसकर महत्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत. हद कर दी या मालिकेत शिल्पाने नम्रता सिंग धनवा ही व्यक्तिरेखा साकारली होती. याच मालिकेत स्वप्नील जोशीने शिल्पाच्या मुलाची भूमिका बजावली होती. निक्कु उर्फ नीरज सिंग धनवा असे स्वप्नीलच्या भूमिकेचे नाव होते. हद कर दि ही एक विनोदी मालिका होती.

स्वप्नील जोशी हा देखील त्यावेळी हिंदी मालिका सृष्टीत चांगली लोकप्रियता मिळवताना दिसत होता. या मालिकांनंतर दोघेही मराठी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करताना दिसले. देवकी, डोंबिवली फास्ट, सनई चौघडे, आनंदाचे झाड, भातुकली, शुगर सॉल्ट आणि प्रेम, लहानपण देगा देवा, जावई माझा भला अशा चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून शिल्पा तुळसकरने आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडली. तू तेव्हा तशी मालिकेतील अनामिकाची भूमिका तिच्यासाठी खूप वेगळी आहे त्यामुळे ही भूमिका काहीशी आव्हानात्मकच आहे असे म्हणायला हरकत नाही. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या वयात खूपच कमी अंतर आहे. त्यामुळेच ह्या दोघांची जोडी पाहायला देखील खूप मस्त वाटते.