स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. इतके दिवस प्रतिमा आत्याला शोधण्यासाठी सायली प्रयत्न करत होती पण आता प्रतिमा आत्याचे सायलिशिवाय पान हलत नाही असेच काहीसे चित्र मालिकेत दिसत आहे. हळूहळू प्रतिमा सुभेदार कुटुंबात रमू लागली आहे पण इथे प्रिया, महिपत आणि नागराज प्रतिमाच्या जीवावर उठले आहेत. दही हंडीची संधी साधून प्रतिमाला संपवण्याचा यांचा डाव आहे. पण आता सायली हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांचा हा डाव कसा उधळणार हे पाहावे लागेल. दरम्यान ठरलं तर मग मालिकेची लेखिका शिल्पा नवलकर यांनीच प्रतिमाचे पात्र वठवले आहे. या मालिकेव्यतिरिक्त त्या आता कलर्स मराठीच्या दुर्गा मालिकेत रेवती मोहितेची विरोधी भूमिका साकारत आहेत.
एकाचवेळी मालिकेचे लेखन आणि २ मालिकेत अभिनय अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. पण ही तारेवरची कसरत करताना त्यांना मुलगी आणि नवऱ्याचा मोठा आधार मिळत आहे. ठरलं तर मग या मालिकेत तन्वी त्यांची मुलगी आहे पण त्यांची रिअल लाईफ मुलगी कधीच मिडियासमोर आली नव्हती. आज त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. शिल्पा नवलकर या गेली अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच त्या मालिकांचे लेखनही करतात. बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषी देशपांडे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. लग्नानंतर कुहूचा जन्म झाला तेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रातून काही वर्षे ब्रेक घेतला होता. पण मालिकेसाठी त्यांचे लिखाण चालूच होते.
मृगजळ, अवंतिका, भाग्यविधाता, कैरी, माया, वहिणीसाहेब, बाईपण भारी देवा, कुसुम अशा चित्रपट मालिकेच्या माध्यमातून शिल्पा नवलकर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर त्यांचा नवरा ऋषी देशपांडे यांनी शाहरुख खानच्या पहेली चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. जिंकी रे जिंकी, समायरा, उडान, समांतर, यक नंबर, सिटीझन अशा चित्रपट आणि व्यवसायिक जाहिरातींसाठी त्यांनी दिग्दर्शक, अभिनेता म्हणून काम केलं आहे. शिल्पा नवलकर यांची मुलगी कुहू देशपांडे ही आता २३ वर्षांची आहे. गेल्या वर्षी कुहूने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते.