माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबा लवकर बरे व्हावेत म्हणून नेहा आणि यशचे लग्न झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नेहा आता रोजच यशच्या घरी जाऊन आजोबांची काळजी घेताना दिसत आहे. नेहा आता चौधरी कुटुंबाची सून आहे आणि रोज उठल्यावर आपल्याला नात सुनेचा चेहरा पाहायला मिळावा अशी त्यांची ईच्छा आहे. आजोबांची ही ईच्छा पूर्ण करत असताना नेहाची मात्र खूप धावपळ होत आहे. या धावपळीत ती परीच्या मनाचाही विचार करत असल्याने तिच्या तारेवरच्या या कसरतीत यशची मोलाची साथ तिला मिळत आहे. आपण लग्न केले हे आजोबांशी खोटं बोललो असल्याने यशला मात्र त्रास होत असतो परंतु यामुळे आजोबांना बरं वाटत असेल तर हे खोटं चांगलं आहे असे समीर त्याला पटवून देतो.

नेहा आता आजोबांची देखभाल करत आहे त्यामुळे ऑफिसमध्ये तिच्या कामाची जबाबदारी सांभाळायला एका पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे. नुकतेच मालिकेत समीरची खास मैत्रीण ‘चारूलता’ने नेहाच्या अनुपस्थितीत कामकाज सांभाळायला घेतले आहे. चारूलताच्या एंट्रीमुळे मात्र शेफाली अस्वस्थ होत आहे. कारण समीर आणि चारूलता खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांचे एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलणे शेफलीला मात्र त्रासदायक ठरत आहे. मालिकेत चारूलताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “सानिका बनारसवाले”. स्वामिनी या लोकप्रिय मालिकेतून सानिका बनारसवाले हिने ‘जानकीबाईची’ भूमिका निभावली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून ती मेघनाची भूमिका साकारताना दिसली होती. सानिका बनारसवाले हीचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईचा. वाईमध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले . ‘खेळी मेळी’ यासारख्या नाटकातून ती रंगभूमीवर चमकली होती. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतून सानिकाचे छोट्या पडद्यावर पदार्पण झाले होते. अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, स्वामिनी, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तिला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली.

स्वामिनी मालिकेमुळे सानिकाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती याच मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. शाळेत असल्यापासूनच सानिका विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घ्यायची. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर रंगभूमीशी ती जोडली गेली. काही जाहिरातींसाठी तिने मॉडेलिंग देखील केलं आहे. तिने फिल्ममेकिंग आणि फोटोग्राफीचे देखील धडे गिरवले आहेत. ऋषभ कटारिया याच्याशी तिची खूप आधीपासूनच ओळख होती. ९ डिसेंबर २०२१ रोजी मोठ्या थाटात त्यांनी लग्न केले होते. महाबळेश्वर येथे तिचा हा विवाहसोहळा पार पडला होता त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली होती. लग्नानंतर आता पुन्हा एकदा सानिका मालिका सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ती महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र या चारूलतामुळे समीर आणि शेफाली यांच्यात दुरावा तर नाही ना येणार अशी पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होत आहे. अर्थात ही भूमिका सकारात्मक असावी अशी अपेक्षा प्रेक्षक करत आहेत. चारूलताच्या एंट्रीमुळे मालिकेत नेमका कुठला ट्विस्ट येणार आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल तूर्तास या नव्या भूमिकेनिमित्त सानिका बनारसवाले हिला शुभेच्छा!