जरा हटके

मी लहान असतानाच बाबा आम्हाला सोडून गेला मग मी बोर्डिंगला जाऊ लागले शाळेची आठवण म्हणून हा टॅटू काढलाय

आपण कितीही मोठे झालो तरी मनात शाळेची आठवण आली की आपण प्रत्येकजण लहान होतो. आपल्याला आजही शाळेत जाता आलं असतं तर असा विचार मनात येऊन जातो .पण अभिनेत्री सखी गोखले आजही रोज सकाळी तिच्या शाळेत फिरून येते असे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का ? पण हो ! खरंच सखी गोखले रोज सकाळी उठल्यावर तिच्या शाळेत फेरफटका मारून येते . . पण एका वेगळ्या रूपातून. शाळेचे प्रतीक म्हणून डोंगर, नदी झाडं असा प्रतिकात्मक टॅटू सखीने हातावर काढला आहे. तो टॅटू पाहिला की ती थेट शाळेत पोहोचते आणि रमतेही ही माझी शाळा आहे. मी बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिक्षण पूर्ण केलंय. माझी शाळा निसर्गाच्या सानिध्यात होती.

actress sakhi gokhale with father
actress sakhi gokhale with father

एका टेकडीवर असलेल्या या शाळेच्या पायथ्याला वाहणारी नदी आणि भोवताली डोंगरदऱ्या होते. जेव्हा या शाळेतील शिक्षण पूर्ण झाले तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणींनी शाळेची आठवण आयुष्यभर जपायचे ठरवले असं म्हणत अभिनेत्री सखी गोखले जेव्हा तिचा हात पुढे करून तिची शाळा दाखवते तेव्हा पाहणारे अचंबित होतात. कारण सखीची शाळा प्रतिकात्मक रूपाने तिच्या हातावर गोंदलेली आहे. सोशल मीडियावर तिने ही गोष्ट शेअर केलीय. ज्येष्ठ अभिनेते मोहन आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी ही मुलगी. तिच्या लहानपणापासूनच घरात सिनेमा, नाटक याविषयीचे वातावरण होते. सखी जेमतेम सहा वर्षाची असताना तिचे पितृछत्र हरपले आणि त्यानंतर शुभांगी गोखले यांनीच तिला लहानाचे मोठे केले. घराची, सखीची जबाबदारी पेलायची असल्याने शुभांगी यांना अभिनयक्षेत्रात कार्यरत राहणे आवश्यक होते. त्यामुळे सखीची रवानगी बोर्डिंगस्कूलमध्ये झाली. शाळेचा आवार, वसतिगृह हेच सखीचे दुसरे घर बनले. जेव्हा तिचे शालेय शिक्षण संपले आणि ती रूपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुंबईला आली. पण त्यापूर्वी सखी बँकॉकला फिरायला गेली होती. तिथे मैत्रिणीसोबत शाळेविषयीच्या आठवणी गप्पांमध्ये सुरू होत्या.

actress sakhi gokhale
actress sakhi gokhale

तेव्हाच दोघींनी ठरवलं की आपल्या शाळेची आठवण आपल्यासोबत असायला हवी. शाळा म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं यावर सखी आणि तिची मैत्रीण बोलत असताना जिथे शाळेची इमारत होती ती टेकडी, आजूबाजूचे डोंगर, दऱ्या, नदी, झाडं, पक्षी असं सगळं सखीच्या डोळ्यासमोर आलं. आता एका टॅटूमध्ये हे सगळं निसर्गचित्र दाखवायचं तर ते सिंबॉलिक असायला हवं. मग काय, सखी आणि तिची सखी अर्थात शाळेतली मैत्रीण दोघींनीही बँकॉकमधल्या मार्केटमध्ये टॅटू काढणाऱ्या कलाकारांचा शोध घेतला. अखेर त्यांना एक टॅटू आर्टिस्ट सापडला. आम्हाला अस्साच टॅटू हवा असा आग्रह धरत या सखीने त्या आर्टिस्टचा पिच्छा पुरवला आणि स्वत:सोबत मैत्रीणीच्या हातावर सेम टू सेम टॅटू काढताना सखी शाळेत मनोमन फिरून आली. सखी सांगते माझ्या आयुष्यातील खूप मोठा काळ या शाळेच्या परिसरात गेला आहे. आई त्यावेळी कामात खूप बिझी होती. मला घरी ठेवून कामासाठी बाहेर जाणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे या शाळा आणि हॉस्टेलमध्ये माझ्या आयुष्यातील खूप संवेदनशील क्षण आहेत. दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी दोबारा या मालिका, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक, पिंपळ हा सिनेमा अशी मोजकी पण नेटकी कामं सखीच्या नावावर आहेत. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील तिचा सहकलाकार सुव्रत जोशी याच्यासोबत लग्न करून सखी सध्या लंडनमध्ये तिचे उच्चशिक्षण पूर्ण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button