
मराठी मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही नवे ट्रेंड येत असतात. सध्या सिंगल मदर, लहान मुलांचं भावविश्व हे ट्रेंड मराठी मालिकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. सध्या सुरू असलेल्या मालिकांपैकी बहुतांशी मालिकांमध्ये लहान मुलांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. तसेच काही मालिकांचं कथानक किंवा मालिकेतील ट्रॅक लहान मुलांच्या व्यक्तीरेखेभोवती फिरताना दिसतो. यामुळे मालिकांच्या लोकप्रियतेमध्ये वाढच होताना दिसते. प्रेक्षकांनाही लहान मुलांचा ट्रॅक आवडत असल्याने सध्या मालिकांच्या टीआरपी वाढीमध्ये बालकलाकार हा चर्चेचा मुद्दा आहे. सध्याच्या लोकप्रिय मालिकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या आलेखावर पहिल्या तीनमध्ये असलेली मालिका रंग माझा वेगळा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

दीपा आणि कार्तिक यांच्यातील प्रेमातून सुरू झालेली ही मालिका सध्या दीपिका आणि कार्तिकी या त्यांच्या मुलींच्या प्रवासापर्यंत आली आहे. दीपिका आणि कार्तिकी या भूमिका लोकप्रिय करण्यात बालकलाकारांचा हात आहे. कार्तिकी आणि दीपिका या बहिणींची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप आवडली. पण आता कार्तिकीच्या चाहत्यांना नाराज करणारी एक बातमी आली आहे. या मालिकेतील कार्तिकीची भूमिका करणारी साईशा भोईर ही मालिका सोडणार आहे. साईशा भोईरने कार्तिकीची भूमिका इतकी छान केली की या मालिकेतील नावाजलेल्या कलाकारांइतकाचा तिचाही चाहता वर्ग निर्माण झाला. साईशा या मालिकेत येण्यापूर्वी सोशलमीडियावर खूप रिल्स, फोटो पोस्ट करायची. ती सोशल मीडियावर स्टार होतीच पण या मालिकेने तिला घराघरात पोहोचवलं. दीपा आणि कार्तिक एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर कार्तिकी दीपासोबत राहू लागली तर दीपिका कार्तिकच्या जवळ आहे असे मालिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे कार्तिकी आणि दीपा यांचे अनेक भावनिक सीन ऑनस्क्रिन असायचे. या सीनमध्ये कार्तिकी साकारणाऱ्या साईशा भोईर हिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता साईशा या भूमिकेत दिसणार नाही हे कळल्यानंतर तिचे चाहते नाराज झाले आहेत.

साईशा भोईर ही रंग माझा वेगळा ही मालिका सोडत असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. तसेच स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टापेजवरही ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता खरोखरच पुढच्या काही भागांपासून साईशा कार्तिकीच्या रूपात दिसणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण साईशाच्या ऐवजी कार्तिकीची भूमिका कोण करणार हे मात्र अद्यात समोर आलेलं नाही. येत्या काही दिवसात मालिकेच्या प्रोमोतून हे दाखवलं जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी साईशाचे काही सीन प्रेक्षकांना दिसतील. नवी कार्तिकी कोण असेल आणि ती साईशाप्रमाणेच कार्तिकी या भूमिकेला न्याय देईल का अशी प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिलेली आहे. तर रंग माझा वेगळा ही मालिका साईशा का सोडतेय याचंही कारण अजून गुलदस्त्यातच आहे. साईशाला नवी कोणती ऑफर आली आहे का हे जाणून घेण्यासाठीही तिचे चाहते उत्सुक आहेत.