कलाकारांनी मालिका अर्ध्यावर सोडणे हे प्रेक्षकांसाठी नवी गोष्ट नसली तरी त्यांच्या जाण्याने मालिकेतला सातत्यपणा निघून गेल्याची जाणीव होते. एखाद्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात जी जागा बनवलेली असते त्यात दुसऱ्या कलाकाराला स्वीकारणे प्रेक्षकांना सुरुवातीला थोडे जड जाते. अर्थात या भूमिकांमुळे या कलाकारांना तशी ओळख मिळालेली असली तरी काही खाजगी करणास्तव त्यांना हा निर्णय घ्यावा लागलेला असतो. लेक माझी दुर्गा या मालिकेतील दुर्गाचे पात्र नुकतेच बदलण्यात आले होते. वरदा पाटीलने ही भूमिका तिच्या अभिनयाने गाजवली होती मात्र अवघ्या काही दिवसातच तीने मालिकेचा निरोप घेतला. तर रंग माझा वेगळा या मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साइशा भोईर हिने देखील नुकतीच मालिका सोडली असल्याचे जाहीर केले आहे.

आता या दोघींपाठोपाठ आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याचे निश्चित झाले आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मालिकेतील कानिटकर कुटुंब प्रेक्षकांना विशेष भावले आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. मालिकेत अमृता फडके हिने साकारलेली मानसीची भूमिका तिच्या अभिनयाने उठावदार झाली आहे. या मालिकेमुळे अमृताला प्रसिद्धी मिळाली. मात्र काही कारणास्तव अमृता ही मालिका सोडत आहे. श्री गुरुदेव दत्त, गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत अमृता झळकली होती. अमृताच्या जागी मानसीची भूमिका आता सई कल्याणकर साकारताना दिसणार आहे. सई कल्याणकर हीने ‘झकास’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. झकास चित्रपटानंतर सईने आशियाना चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली होती. स्टार प्रवाहवरील ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ ही मालिका तसेच कलर्स मराठी वरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या अध्यात्मिक मालिकेतून सई ने सिद्धीची भूमिका साकारली होती.

अस्स सासर सुरेख बाई, मांडला दोन घडीचा डाव, अस्मिता, सखी, तू माझा सांगाती, अग्निपरीक्षा अशा मालिकांमधून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. डिसेंबर २०२१ रोजी सई आणि डॉ प्रशांत चव्हाण यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर सई पुन्हा मालिका क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे. ठिपक्यांची रांगोळी या लोकप्रिय मालिकेत तिला मानसी वहिनींची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. अमृताने तिच्या अभिनयाने मानसीची भूमिका सुरेख वठवली होती. त्यामुळे सई साठी ही भूमिका आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र सई कल्याणकर ही एक गुणी अभिनेत्री आहे आजवर वेगवेगळ्या मालिकांमधून तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत त्यामुळे प्रेक्षक तिला या भूमिकेत नक्कीच स्वीकारतील अशी आशा आहे. या नवीन भूमिकेसाठी सई कल्याणकर हिचे अभिनंदन आणि शुभेच्छा!.