लव्ह लग्न लोचा, मनातल्या उन्हात, फेकम फाक, आता माझी हटली, भुताचा भाऊ अशा चित्रपट, मालिका मधून अभिनेत्री रुचिता जाधव हिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. बहुतेक चित्रपटातून भरत जाधव सोबत तीने स्क्रीन शेअर केलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने यांचा ३ मे २०२१ रोजी विवाहसोहळा संपन्न झाला होता. पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये हा विवाहसोहळा अगदी मोजक्याच मित्रमंडळींसमवेत पार पडला होता . त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले. रुचिताने लग्नात लाल रंगाचा शालू परिधान केलेला पाहायला मिळाला तर तिला साजेशा अशा पेहरावात आनंद माने देखील सज्ज झालेले दिसले.

१ मे ते ३ मे या तीन दिवसात त्यांचे कुटुंब पाचगणीतील फार्महाऊसमध्ये थांबले होते. पहिल्या दिवशी मेहेंदीचा आणि त्यानंतर हळदीचा सोहळा संपन्न झाला यात त्यांनी संगीत सोहळा करण्याचेही योजले होते मात्र आपल्या लग्नात काहीतरी खास असावे या हेतूने त्यांनी आपला संगीत सोहळा थांबवून आसपासच्या गावकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला. पाचगणी येथील आसपासच्या काही गावामध्ये जाऊन त्यांनी १५०० गावकऱ्यांना धान्याचे वाटप केले आहे. यामुळे रुचिताच्या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्ये व्हायरल झाली तिच्या या आगळ्यावेगळ्या कामाचे गावकऱ्यांकडून तितकेच कौतुकही केले गेले. वाटप केलेल्या १५०० धान्याच्या पाकिटांमध्ये अडीच किलो डाळ आणि अडीच किलो तांदूळ भरण्यात आले होते. गावातील प्रत्येक व्यक्तीला अडीच किलो डाळ आणि अडीच किलो तांदूळ वाटून त्यांनी त्यांचा संगीत सोहळा साजरा केला होता. किमान इतकी तरी आम्ही मदत करू शकलो याचे समाधान रुचिताने मीडियाशी बोलताना व्यक्त केले आहे. यात आणखी एक बाब तिने मीडियाशी बोलताना सांगितली की ‘आमचा लग्न सोहळा फार्म हाऊसच्या बाहेरच्या बाजूस अगदी निसर्गाच्या सानिध्यात होणार होता परंतु अचानक आलेल्या पावसामुळे हा लग्नसोहळा आतमध्ये करण्यात आला. रुचिताने आपल्या लग्न सोहळ्याचा व्हिडीओ आणि मेहेंदी सोहळ्याचे फोटो इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. लग्नाच्या या हटके बातमीमुळे रुचिताला पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली आहे.