‘रंजना देशमुख’ मराठी चित्रपट सृष्टीतने हरवलेलं रत्न प्रेक्षकांना त्यांच्या बायोपिकमधून पुन्हा गवसणार आहे. रंजनाचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावरून अनुभवता येणार असल्याने तमाम प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘रंजना- अनफोल्ड’ हा चित्रपट रंजना देशमुखच्या स्मृतिदिनी म्हणजेच पुढच्या वर्षी ३ मार्च २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे जाहीर करण्यात आले आहे. कार्निव्हल मोशन पिक्चर्स प्रॉडक्शन अंतर्गत डॉ श्रीकांत भसी प्रस्तुत रंजना अनफोल्ड या चित्रपटाची निर्मिती वैशाली सर्वांकर यांची असून दिग्दर्शन अभिजित मोहन वारंग करणार आहेत. या चित्रपटाचे लेखन स्वतः अभिजित मोहन वारंग यांनी केले आहे. चित्रपटातून लाडक्या रंजनाचा जीवनप्रवास उलगडणार असल्याने प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत.

रंजनाची आई वत्सला देशमुख यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. रंजनाची मावशी संध्या शांताराम आणि वत्सला देशमुख या दोघी बहिणींनी अनेक चित्रपटातून एकत्रित काम केले. रंजनाने शिकून मोठे व्हावे अशी त्यांच्या आईची ईच्छा होती मात्र ओघानेच रंजनाचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले. खरं तर वत्सला देशमुख जय शंकर या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला जात होत्या. त्यावेळी रंजना अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या होत्या. या चित्रपटात वत्सला देशमुख रावणाच्या आईच्या भूमिकेत होत्या. रंजना लहान असल्याने त्या तिला सोबत घेऊन जायच्या. एका सीनमध्ये यांच्या हातात लहान मूल दाखवायचे होते. त्यावेळी रंजनालाच त्यांनी आपल्या हातात घेतले होते. हा रंजनाचा पहिला चित्रपट ठरला होता मात्र अभिनेत्री म्हणून चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले. बिन कामाचा नवरा, चाणी, गुपचूप गुपचूप, एक डाव भुताचा, झुंज अशा अनेक दर्जेदार चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांना कळाली होती. नुकतेच अशोक सराफ यांनी देखील एका मुलाखतीत रंजनाचे कौतुक केले होते. ‘रंजना व्यतिरिक्त मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण तिच्यासारखी दुसरी नटी कोणीच नाही, तिच्यासारखी तीच’. असे त्यांनी आपल्या मैत्रिणीचे कौतुक केले होते. रंजना आणि अशोक सराफ यांचे नाते मैत्रिपलीकडचे होते हे सर्व प्रेक्षकांना ठाऊक आहे त्यामुळे त्यांच्या प्रवासातला हा क्षण देखील प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

१९८७ साली झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना रंजनाच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. पाय निकामी झाल्याने त्यांच्या अभिनयाची कारकीर्द संपुष्टात आली. एकाच जागेवर अंथरुणावर खिळून असलेल्या रंजनाजींना पाहून त्यांच्या आई गहिवरून जायच्या. अखेर ३ मार्च २००० रोजी रंजनाजींनी शेवटचा श्वास घेतला. रंजनाच्या आयुष्यातले अनेक किस्से या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र रंजनाच्या भूमिकेत कोणती नायिका दिसणार या बाबत प्रेक्षकांच्या मनात प्रशचिन्ह उपस्थित होत आहेत. तिच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देणारी नायिका कोण असेल? हे अजून गुलदस्यात ठेवण्यात आले आहे. तूर्तास चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून रंजनाच्या स्मृतिदिनी हा चित्रपट पाहायला मिळणार हे तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली आहे.