मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळायला लागला की ती मालिका आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जातो. झी मराठी वाहिनीवरील अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. मन झालं बाजींद ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली. या मालिकेला गावरान बाज असल्याने ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळवत होती. मात्र मालिकेची नायिका म्हणजेच कृष्णावर ओढवलेल्या सततच्या संकटांमुळे मालिकेचे कथानक कंटाळवाणे वाटू लागले. राया आणि कृष्णा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात मात्र काहीतरी घडामोडी घडतात आणि या दोघांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होतो.

बहुतेकदा मालिकेतून एकच एक घडामोडी घडताना पाहून या मालिकेकडे आता प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे परिणामी प्रेक्षकांचा अल्पसा प्रतिसाद मिळू लागल्याने आता मन झालं बाजींद ही मालिका आटोपती घेण्यावर भर देण्यात येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत ट्विस्ट म्हणून दादासाहेबांची एन्ट्री करण्यात आली होती मात्र त्याकडेही प्रेक्षकांनी कानाडोळा केलेला पाहायला मिळाला. कृष्णा सीए झाली मात्र ती आपल्या शिक्षणाचा फायदा कुठेच करताना दिसली नाही हे मालिकेच्या प्रेक्षकांना कळून चुकले. आता प्रेक्षकांची हीच नाराजी लक्षात घेऊन मालिकेत कृष्णा आपल्या शिक्षणाचा उपयोग करत असल्याचे दाखवण्यात येऊ लागले आहे. तिचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला आहे . त्यामुळे ही मालिका हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. मात्र आता ही मालिका ११ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात मालिकेचा शेवट गोड होणार हे निश्चित आहे हे प्रेक्षक देखील चांगलेच जाणून आहेत.

१२ जून पासून या मालिकेच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर नवी मालिका प्रसारित होत आहे. या नव्या मालिकेचे नाव आहे ‘सत्यवान सावित्री’. सत्यवान सावित्री ही अध्यात्मिक मालिका आहे. झी मराठी वाहिनीने या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आणला आहे. ज्यात बालपणीच्या सत्यवान सावित्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सत्यवान सावित्री या मालिकेत चिमुरड्या सावित्रीची भूमिका बालकलाकार राधा धारणे साकारणार आहे. राधा धारणे हिने याअगोदर सोनी मराठी वरील आनंदी हे जग सारे या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली होती. मालिकेत आनंदी ही स्पेशल चाईल्ड होती. राधाने ही भूमिका सुरेख साकारली होती मालिकेने लीप घेतल्यानंतर आनंदीची भूमिका रुपल नंद या अभिनेत्रीने निभावली होती. सत्यवान सावित्री या मालिकेतून राधा धारणे पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. या नव्या मालिकेसाठी राधा धारणे या बालकलाकाराला मनःपूर्वक शुभेच्छा…