“राष्ट्रवादी पार्टी म्हणजे रंगलेल्या गालावरचा मुका घेण” प्रवीण दरेकर यांच्या विधानावर प्रिया बेर्डेचे प्रतिउत्तर

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्याबरोबर लोककलावंत आणि शांताबाई फेम संजय लोंढे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेत आहेत. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर प्रवीण दरेकर यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, ‘राष्ट्रवादी पार्टी म्हणजे रंगलेल्या गालावरचा मुका घेणार आहे’. त्यांच्या या विधानावर कालाक्षेत्रातून निषेध वर्तवला जात आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विधानावर चोख प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात की, ‘प्रवीण दरेकर यांचे किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांचे असे विधान चूकच आहे त्याचा मी निषेध करते.कुठल्याही महिलांवरती किंवा कलाकारांवर असे विधान करणे हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही कलाकार मागील दोन वर्षांपासून तोंडाला रंग लावून तुमचे मनोरंजन करत आहोत हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरतात. राष्ट्रवादी पक्ष आम्हा कलाकारांच्या मदतीला नेहमीच धावून आलेला आहे…..’ पुढे प्रिया बेर्डे सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाबाबत असेही म्हणाल्या की, प्रवीण दरेकर यांनी केलेलं हे विधान याच गोष्टीला अनुसरून आहे. लोककलावंत, तमाशा कलावंत ह्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही इतक्या खालच्या पातळीचा असू शकतो याचं मला वैषम्य वाटतं…लोककलावंत, लावणीकलावंत हे अंगभर कपडे घालून लोकांसमोर आपली कला सादर करत असतात. ते कुठेही मिनिस्कर्ट किंवा शॉर्टस घालून आपली कला सादर करत नाहीत तरीही आजही त्यांच्याकडे याच दृष्टीने पाहिले जाते.

राष्ट्रवादीचा सांस्कृतिक विभाग लोकांचा हा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच प्रयत्न करेन. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील हे उत्तम वक्ते आहेत, उत्तम विचारसरणी असलेले राजकीय नेते आहेत काय बोलावं ह्याच भान त्यांच्याकडे आहे किमान ह्यांनी तरी आपल्या लोकांना बोलताना तारतम्य बाळगायला शिकवले पाहिजे. या वक्तव्याबाबत त्यांनी माफी देखील मागितली पाहिजे. केवळ प्रवीण दरेकरच नाही तर असे वक्त्यव्य कोणीही करू नये, तुमची हिम्मत होतेच कशी तुम्ही कुठल्याही कालाकाराबद्दल किंवा महिलेबद्दल असे बोलणे साफ चुकीचे आहे. इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण करू नये असे प्रिया बेर्डे म्हणतात. प्रिया बेर्डे ह्या पुणे राष्ट्रवादी पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्ष आहेत. प्रवीण दरेकर यांच्या वक्त्यव्याचा निषेध करत आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.