अजूनही बरसात आहे या सोनी मराठी वरील मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. मल्हार आणि मनूचे लग्न व्हावे म्हणून आदिराज त्याच्या वडिलांनी आणलेल्या स्थळाला होकार देत आहे. त्यामुळे आदिराज आणि मीराचे लग्न होणार की नाही? हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा राहतो. दरम्यान आदिराज आणि सानिका एकमेकांच्या विचाराने दोघेही लग्न करण्याचा निर्णय सांगतात. मात्र या मागे त्यांचे एक खास कारण आहे. सानिकला ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंगची भारी हौस आहे त्यामुळे काही दिवसांनी तिला परदेशात जायची ईच्छा आहे. हे दोघेही केवळ वडीलांच्या इच्छेखातर ही वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात आहेत.

मालिकेत सैनिकाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे विद्याधर जोशी यांनी आणि सानिकाच्या भूमिकेत दिसत आहे अभिनेत्री “प्राजक्ता दातार -गणपुले”. अजूनही बरसात आहे या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता दातारची नुकतीच एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ती सानिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आदिराजसोबत लग्न करण्याचा तिचा अजिबात विचार नसला तरी तिच्या असण्याने मालिकेत एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. प्राजक्ता दातार ही मराठी सृष्टीत चित्रपट, नाट्य आणि मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेतून समिधाची भूमिका तिने साकारली होती. यात ती काहीशी विरोधी भूमिका दर्शवताना दिसली होती. प्राजक्ता दातारचे दिग्दर्शन आणि कथालेखन असलेली ‘ धागा ‘ ही शॉर्ट फिल्म बनवली होती. त्याला कोलकता इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, 19th एशियन फिल्म फेस्टिव्हल, बेंगळुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आणि जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल साठी निवडण्यात आले होते. एवढेच नाही तर ‘मधुरव’ साठी कथा लेखनाचे कामही तिने केले आहे. त्यामुळे प्राजक्ता केवळ अभिनेत्रीच नाही तर दिग्दर्शिका आणि लेखिका म्हणूनही या सृष्टीत काहीतरी वेगळेपण घेऊन येण्याच्या प्रयत्नात आहे.

कहाणी में ट्विस्ट, गुमनाम है कोई, नवरी नटली सुपारी फुटली, बेधुंद अशा मोजक्या चित्रपट आणि नाटकातून तिने अभिनय साकारला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला होता. यात ती विरोधी भूमिकेत दिसली असली तरी कालांतराने ती राधिकाच्या बाजूने झाली होती. या मालिकेनंतर ती दिगदर्शन क्षेत्राकडे वळली होती. बऱ्याच कालावधी नंतर आता प्राजक्ता पुन्हा एकदा मालिकेतून सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेतून ती सानिकाच्या भूमिका बजावत आहे. सानिकाचे पात्र आदिराजच्या मताशी मिळतेजुळते आहे. आपल्या आयुष्यात कुठलीही बंधने नसावीत या विचाराची सानिका वडिलांच्या आग्रहाखातर आदिराजसोबत लग्न करण्याला होकार देत आहे आदिराज आणि सानिका यांच्या लग्नाच्या होकारावरून मालिकेत आणखी काय काय धमाल घडून येणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. या मालिकेसाठी आणि सानिकाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री प्राजक्ता दातार हिचे खूप खूप अभिनंदन ..