आपल्या मनातल्या ईच्छा भावना व्यक्त करायच्या असतील तर सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. मात्र आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळणे ही खरं तर कलाकार आणि प्रेक्षकांसाठी देखील एक मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. असेच एक व्यासपीठ झी मराठी वाहिनीने उपलब्ध करून दिल्याने तमाम प्रेक्षकांनी वाहिनीचे आभार मानले आहेत. हे व्यासपीठ म्हणजेच सुबोध भावे सूत्रसंचालन करत आलेला ‘बस बाई बस ‘ हा नवीन रिऍलिटी शो. बस बाई बस च्या मंचावर आजवर सुप्रिया सुळे पासून पंकजा मुंढे, अमृता फडणवीस अशा राजकारण्यांनी हजेरी लावली तर अमृता खानविलकर , क्रांती रेडकर, भरत जाधव हे कलाकार देखील या शोमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळाले. क्रांती रेडकर आणि भरत जाधव कोंबडी पळाली… या त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकलेले पाहायला मिळाले.

आजच्या बस बाई बस च्या विशेष भागात अभिनेत्री पूजा सावंत हजेरी लावताना दिसणार आहे. पूजा सावंत हिने सहाय्यक अभिनेत्री ते मुख्य नायिका असा प्रवास अनुभवला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतही तिला महत्वाच्या भूमिकेत झळकण्याचा मान मिळाला आहे. नुकताच तिचा मुख्य भूमिका असलेला दगडी चाळ २ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने पूजा सावंत हिने झी मराठीवरील रिऍलिटी शोमध्ये हजेरी लावली आहे. चला हवा येऊ द्या या मंचनांतर आता पूजा सावंत आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बस बाई बस या रिऍलिटी शोमध्ये उपस्थिती लावली आहे. चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना पूजाने कोणासोबत लग्न करायला आवडेल याचाही खुलासा केला आहे. पूजा सावंत हिने मराठी चित्रपटातून वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान सोबत काम केले आहे. या तिघांची खूप चांगली मैत्री देखील आहे. अनेकदा हे तिघेही एकत्रित वेळ घालवताना ट्रिप एन्जॉय करताना पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे पुजाचे अनेक वेळा या दोघांसोबत नाव जोडले जाते. मध्यंतरी भूषण प्रधान आणी पूजा सावंत एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा रंगवल्या गेल्या.

मात्र पूजाला मराठी अभिनेता नव्हे तर चक्क बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न करण्याची मनापासून ईच्छा आहे. हा बॉलिवूड अभिनेता आहे सिद्धार्थ मल्होत्रा. ‘खूप मोठा क्रश आहे तुझ्यावर ,आवडेल मला तुझ्याशी जर लग्न झालं माझं तर ‘ अशी गोड प्रतिक्रिया तिने सिध्दार्थचा फोटो पाहून दिली आहे. मुळात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच दिवसंपासूनच्या चर्चा आहेत. लवकरच हे दोघे लग्नही करतील असेही बोलले जात आहे. बस बाई बस या शो मध्ये पूजाला पदार्थ ओळखण्याचा एक टास्क देण्यात आला होता. ही धमालमस्ती आजच्या भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी पूजाने तिच्या खास अंदाजात देवाला गाऱ्हाणे देखील घातलेले दिसून येते. त्यामुळे ही मजामस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक आहेत.