बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अवघ्या काही तासातच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. अमृता खानविलकर या चित्रपटात ‘चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर’ हे पात्र साकारत आहे. तर आदिनाथ कोठारे खासदार दौलतराव देशमानेची भूमिका निभावत आहे. चंद्रमुखी हा चित्रपट प्रेमाचा त्रिकोण असणारा चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची दमदार एन्ट्री होणार आहे. सौभाग्यवती दमयंती दौलत देशमाने हे पात्र साकारले आहे मृण्मयी देशपांडे हिने. मृण्मयी या चित्रपटात दौलतच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

चंद्रामुळे संसार पेटवायला निघालेल्या दौलतरावाला पुन्हा परत मिळवण्यासाठी ही दमयंती वेळप्रसंगी चंद्राला देखील कानाखाली वाजवताना दाखवली आहे. दमयंतीचा विरोध चंद्रा आणि दौलतच्या नात्यात दुरावा निर्माण करत असला तरी शेवट मात्र हे दोघेही एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. प्रसाद ओकने साधारण दोन वर्षांपूर्वी चंद्रमुखी या चित्रपटाचे नाव जाहीर केले होते. त्यावेळी ही चंद्रमुखी कोण आहे याबाबत चर्चा रंगल्या होत्या. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर आहे हे जाहीर करण्यात आले होते. चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असल्याने तिच्याबाबत उत्कंठा अधिक वाढलेली पाहायला मिळत आहे. येत्या २९ एप्रिल रोजी चंद्रमुखी चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील एकेक पात्र टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांसमोर दाखल झाली आहेत. चंद्राच्या भूमिकेसाठी अमृताने मोठी मेहनत घेतली आहे . या चित्रपटासाठी तीने आपलं वजन देखील वाढवलं आहे. चंद्रा साकारणे हे खरं तर खूप मोठे आव्हानाचे काम होते असे अमृता म्हणते. चंद्रा म्हणजे संघर्ष, त्याग, प्रेम, बलिदान, कृष्णभक्त आणि नृत्यांगना आहे.

तिचा जीवनातला संघर्ष मी देखील गेल्या दोन वर्षांपासून अनुभवला आहे त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असे तिचे मत आहे. वाजले की बारा या लोकप्रिय गाण्यानंतर अमृतासाठी चंद्रमुखी हा चित्रपट खूपच महत्वाचा ठरला आहे. त्यामुळे या भूमिकेबाबत ती खुपच उत्सुक आहे. एवढेच नाही तर चित्रपटात ओरिजनल नथ घालावी लागणार हे प्रसादने बजावून सांगितले असल्याने अमृताने नाक टोचले होते मात्र काही दिवसातच ते बुजून गेले तेव्हा तिला पुन्हा एकदा नाक टोचवे लागले. शूटिंगदरम्यान नथ घातल्यानंतर नथीवर रक्त साचायचे ते वोळोवेळी पुसून घ्यावे लागायचे. भूमिकेसाठी अमृताने घेतलेली ही मेहनत निश्चितच फळाला येणार यात शंका नाही. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटातील गाणी देखील तुफान लोकप्रिय झाली आहेत. ट्रेलरवरूनच हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना चित्रपट गृहांपर्यंत नक्की खेचून आणणार याची खात्री आहे.