माझा होशील ना या मालिकेतील आदित्यची भूमिका साकारून अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा अभिनय क्षेत्रात आला. या मालिकेमुळे विराजस महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. नुकतीच मृणाल कुलकर्णी आणि विराजस या दोघांनी मीडियाला एकत्रित एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या वेगवेगळ्या गमतीजमतींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. मृणाल कुलकर्णी यांनी या मुलाखतीत आपली होणारी सून कशी असावी याबाबत खुलासा केला आहे.

सुरुवातीला चेष्टा मस्करी करत त्यांनी माझ्या होणाऱ्या सुनेने तांदूळ निवडून दाखवावेत म्हणजे तिची नजर चांगली आहे की नाही हे मला समजेल… तिने गाऊन दाखवावे म्हणजे तिला बोलता येते की नाही हे मला समजेल …. तसेच तिने चालूनही दाखवावे असे म्हणत स्वतः मृणाल कुलकर्णी यांनी विराजसची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आणि यातून दोघांच्याही चेहऱ्यावर हास्याचे फवारे उडालेले पाहायला मिळाले. मुळात त्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेबद्दल खूपच साध्या अपेक्षा मांडल्या आहेत…माझ्या मुलाची ती उत्तम मैत्रीण असावी…दोघांनी एकमेकांना कायम साथ द्यावी ..बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत… विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे….आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही सर्वस्वी त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू.”

मृणाल कुलकर्णी यांचा देखील प्रेमविवाह झाला आहे. दिवंगत अभिनेते जयराम कुलकर्णी हे मृणाल चे सासरे रुचिर हा त्यांचा मुलगा. मृणाल आणि रुचिर दोघेही बालपणापासूनचे चांगले मित्र या मैत्रीचे पुढे प्रेमविवाहात रूपांतर झाले त्यामुळे आपल्या मुलाने देखील प्रेमविवाह केल्यास त्याला त्यांची पूर्ण साथ मिळेल असेही त्यांनी आपल्या बोलण्यातून आश्वस्त केले आहे. दरम्यान विराजसने थोड्या फार स्तुतीने हुरळून न जाता आपले पाय जमीनीवरच ठेवावेत त्यासाठी त्याने आईला आपण काम करत असलेल्या ठिकाणी नेहमी घेऊन जावे असेही त्या एकदा चला हवा येऊ द्या च्या मंचावर म्हणाल्या होत्या. या दोघा माय लेकाचे नाते इतके घट्ट आहे की ते कायम असेच राहावे अशीच अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येते. या दोघांनी एकत्रित कामही केले आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. गौरव पत्की यांच्या “आईची जय” या शॉर्टफिल्ममधून दोघांनी आई मुलाची भूमिका साकारली होती. तर मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित रमा माधव या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून विराजसने काम सांभाळले होते.