मुलांचा वाढदिवस ही प्रत्येक आईवडीलांसाठीही आनंदाची गोष्ट असते. लेकराच्या आयुष्यातील हा महत्वाचा दिवस पालक म्हणून त्यांनाही एक वर्ष मोठं करणारा असतो. मुलांच्या वाढदिवसाचे प्लॅनिंग हा तर सोहळाच असतो. मग मुलगा सेलिब्रिटी असला तरी तो आईसाठी तो तिचा मुलगाच असतो. त्यात आईही ही सेलिब्रिटी असेल तर त्या वाढदिवसाला ग्लॅमर येतं म्हणा. पण त्या ग्लॅमरशिवायही आईवडील आणि मुलाचे बाँडिंग किती घट्ट आहे याची प्रचिती त्यांच्या नात्यातून येत असते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांचे किस्से त्यांच्या सोशलमीडिया पेजवर नेहमीच ऐकायला मिळतात. त्यामुळे या दोघांच्याही पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. नुकतीच मृणाल कुलकर्णी हिने एक पोस्ट शेअर करत मुलगा विराजसला हटके शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या शुभेच्छांमध्ये कौतुकही आहे आणि जबाबदारीचे भान देण्याच्या कानपिचक्याही आहेत. विराजसचा यंदाचा वाढदिवस अनेक अर्थांनी खास असल्याने आई मृणाल यांनी शुभेच्छांमधून त्याला काही सल्लेही दिले आहेत. या शुभेच्छांसोबत मृणाल यांनी विराजसचे एक सिक्रेटही उघड केले आहे. आज विराजसचा वाढदिवस आहे. यासाठीच मृणालने ही पोस्ट सोशलमीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं लिहिलं आहे की, अनेक वर्ष आम्ही दोघे तुझ्या या वाढदिवसाची वाट पहात होतो. कारण काहीही ठरवायचं असलं की तू फेब्रुवारी २०२२ नंतर बघू असं उत्तर द्यायचास. बरं झाले, या तारखेआधीच तू काही गोष्टी ठरवल्यास. महत्त्वाचे म्हणजे शिवानी रांगोळेसोबत लग्न करण्याचे ठरवलस. तर नवं नाटक हातात घेऊन ही गोष्ट तू पूर्ण करत आहेस. तुझा नवीन सिनेमाही लवकरच येतोय. या वाढदिवसापासून नव्या गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहेत. त्यामुळे तुझं आयुष्य सुंदर बनेलच. लग्न होईल. जबाबदारी वाढेल. आई बाबा म्हणून आम्हाला खात्री आहे की नव्या पर्वात तून नेहमीच्या आत्मविश्वासाने आणि तळमळीने काम करशील. मेहनती आणि समजूतदार तर तू आहेसच. छान रहा, काळजी घे. आयुष्यातील महत्त्वपूर्ण वर्षासाठी तुला खूप शुभेच्छा. तर अशा शब्दात मृणाल यांनी विराजसवर वेगळ्या पध्दतीने केलेली शुभेच्छांची बरसात चर्चेचा विषय बनली आहे. इतक्या छानपणे दिलेल्या या शुभेच्छा विराजसलाही खूप आवडल्या आहेत. आता मृणाल यांनी विराजसचे नेमके कोणते सिक्रेट फोडले आहे याची उत्सुकता असेल ना. तर या शुभेच्छा पोस्टच्या खाली ताजा कलममध्ये मृणाल यांनी त्याची खोली आवरून ठेवल्याचा निरोपही त्याच्यासाठी लिहिला आहे.

यावरून आपल्या लक्षात येईल की घराघरात मुलं जशी खोलीत पसारा करून ठेवतात आणि तो पसारा आईला आवरावा लागतो, तीच घर घर की कहानी मृणाल आणि विराजस या मायलेकांच्याही आयुष्यात आहे. मी खोली आवरली आहे, त्यामुळे येताना मानसिक तयारी करून ये असं सांगत मृणाल यांनी मिश्कील चपराकही मारली आहे. या पोस्टवर अनेकांनी विराजसला तर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेतच पण, मृणाल यांच्यातील आईलाही सलाम करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराजस नेहमीच सांगत आला आहे की अभिनय क्षेत्रात व लेखन क्षेत्रात आईने त्याला कधीच सक्ती केलेली नाही. मार्गदर्शन करतानाही फक्त वास्तव सांगून निर्णयस्वातंत्र्य दिले आहे. आजपर्यत विराजसच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आईने साथ दिली आहे. त्यामुळे तिच्या या शुभेच्छातील प्रत्येक शब्द मला खूप आवडला असं विराजसने सांगितलं. गेल्याच महिन्यात विराजसने त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला. यावर्षी ते लग्न करणार आहेत. माझा होशील ना या मालिकेतून विराजसने छोट्या पडदयावर पदार्पण केलं असले तरी विराजस प्रायोगिक नाटक लेखनात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे. विराजस सोशलमीडियावरही सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट असतो. यंदाचा वाढदिवस त्याच्या आयुष्यात खूप नव्या गोष्टी आणणारा असल्याने विराजसही खूप उत्सुक आहे.