सध्या सगळीकडेच लगीनघाई सुरू आहे. मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या लग्न बंधनात अडकत आहेत . आता कुणाचं ठरलं असं म्हणत चाहतेही आपल्या आवडत्या सेलिब्रिटी जोडप्यांच्या लग्नाच्या तारखा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत .अशीच एक मराठीमधील चर्चेतली जोडी म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. विराजस आणि शिवानी यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता लग्न ठरलं म्हटलं की कपल्स प्री वेडिंग शूट मध्ये ही दंग होतात. पण इथे मात्र एका वेगळ्याच जोडीचं फोटो सेशन सोशल मीडियावर सध्या गाजत आहे आणि ही जोडी आहे होणाऱ्या सासू-सुनेची म्हणजेच मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची. सून माझी लाडाची असं म्हणत त्यांनी शिवानी सोबत एक झक्कास फोटोसेशन केले आहे.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचं लग्न ठरल्याची बातमी जानेवारीमध्ये त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. गोव्यातील एका क्रूझ वर रम्य सायंकाळी शिवानीच्या बोटात अंगठी घालून विराजसने तिला प्रपोज केलं. या दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात कॉम्बो ड्रेसिंग करून शिवानी आणि विराजस यांनी त्यांच्या रिलेशनशीपची हिंट दिली होती. ही जोडी लग्न कधी करणार याची चाहते वाट बघत असतानाच आता विराजस आणि शिवानी च्या लग्नाचा मुहूर्त 7मे ठरला आहे. लग्नघटिका जवळ आल्याने सध्या ही जोडी केळवणांचा आस्वाद घेत आहे. विराजस आणि शिवानी हे नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नात्यात बद्दल खुल्लमखुल्ला सांगत असतात. जितकी उत्सुकता शिवानी आणि विराजस या जोडीबद्दल आहे तितकीच उत्सुकता ही शिवानी आणि मृणाल यांच्या नात्याबद्दलही आहे. एका मुलाखतीत तुम्हाला कशी सून हवी या प्रश्नावर मृणाल म्हणाल्या होत्या की ती विराजसची चांगली मैत्रीण असावी आणि त्याची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात यावी यापेक्षा दुसरी काहीच अपेक्षा नाही. शिवानी च्या येण्याने मृणाल यांची ही अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो.

मृणाल आणि शिवानी या होणाऱ्या सासू-सून एकाच क्षेत्रात असल्यामुळे त्यांचेही छान जमतं .. खरेतर शिवानी ही विराजसची अनेक वर्षापासूनची मैत्रीण आहे आणि त्यामुळेच होणाऱ्या सासुबाई म्हणजेच मृणाल यांच्यासोबत ही शिवानी ची केमिस्ट्री छान जुळली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवानी आणि मृणाल यांनी एक झकास फोटोसेशन केले आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोमध्ये या दोघी सासूसुना कमालीच्या सुंदर दिसतायत. शिवानी ने या फोटोमध्ये गुलाबी रंगाची साडी आणि बलून स्टाइल ब्लाउज घातला आहे तर मृणाल यांनी काळी, गुलाबी काठ असलेली साडी नेसली आहे. या फोटोची सध्या खूपच चर्चा रंगली आहे. शिवानी आणि विराजस यांच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. सांग तू आहेस का ? या मालिकेतील शिवानीची सहकलाकार वैभवी म्हणजेच सानिका चौधरीने या जोडीला केळवण केलं. विराजस आणि शिवानी यांच्या पुण्यातील घरात सध्या लगीनघाई सुरू आहे . एकीकडे विराजस आणि शिवानी यांचं फोटोसेशन तर सुरु आहेच. शिवाय प्री-वेडिंग व्हिडिओ देखील तयार होत आहेत. पण या सगळ्या लगीनघाईमध्ये शिवानी आणि मृणाल या सासु-सुनांच्या फोटोला या दोघींचेही चाहते भरभरून कमेंट देखील करत आहेत.