९० च्या दशकातील गोट्या मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. या मालिकेच्या अनेक गोड आठवणी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. आठवड्यातून एकदाच ही मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होत होती. त्यामुळे मागच्या भागाची आठवण ठेवून पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता लागून राहायची. जॉय घाणेकर, सुहास भालेकर, सविता मालपेकर, मानसी मागिकर, भैय्या उपासनी अशी बरीचशी कलाकार मंडळी या मालिकेला लाभली होती. या मालिकेत मानसी मागिकर यांनी माईंची भूमिका साकारली होती. आज या माई म्हणजेच मानसी मागिकर झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत झळकताना दिसतात. का रे दुरावा, खुलता कळी खुलेना अशा मालिकांमधून त्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळाल्या. मानसी मागिकर या पूर्वाश्रमीच्या विनया तांबे. त्यांच्या आई गायिका होत्या त्यांनी गाण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

मात्र खूप कमी वयातच लग्न झाल्याने त्यांनी आपली आवड सोडून दिली होती. आपली राहिलेली ही ईच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलीला लहानपणापासूनच बालनाट्यातून सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. नाटक, एकांकिका, पुरुषोत्तम करंडक यामधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. १९८५ साली राजदत्त यांच्या पुढचं पाऊल चित्रपटामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘एकाच या जन्मी जणू’ चित्रपटातील हे अजरामर गीत आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याच चित्रपटामुळे त्यांना गोट्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेल्या गोट्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यांनीच मानसी मागिकर यांना माईंची भूमिका देऊ केली होती. नुकतेच मानसी मागिकर यांनी एका मुलाखतीत गोट्या मालिकेच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. गोट्या मालिकेला कोकणी बाज होता त्यामुळे ही मालिका मढमध्ये शूट करण्यात आली होती. सुतरवाडीच्या कोपऱ्यावर एक जुनी बिल्डिंग होती तिथेच कोकणाची वाडी वाटावी असं वातावरण होतं. ही मालिका आठवड्यातून एकदाच प्रसारित केली जात होती. गोट्या हा अनाथ मुलगा असतो त्याचे काका काकू त्याचा खूप छळ करत असत. त्याला खायलासुद्धा देत नसत. माई त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करत . ही मालिका १३ च्या पटीत वाढवून मिळायची. २६ भागापर्यंत ही मालिका वाढवून मिळाली त्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे ही मालिका पुढे ३९ भाग वाढवून मिळाली. मात्र ३३ व्या एपिसोडला राजदत्त यांनी सांगितलं की ‘आता आणखी पाणी घालणं शक्य नाही’.

आताच्या मालिका पाहिल्यानंतर वाटतं की आताचे प्रोड्युसर आज असं उत्तर देतील का? पण राजदत्त यांची कामाप्रती एक निष्ठा होती. मालिकेच्या कथेची मर्यादा माहीत असल्याने उगीचच काहीतरी दाखवायचं हे त्यांना मान्य नव्हतं. ही गोष्ट शक्य असली तरीही त्यांनी ते वाढवून दाखवण्यास टाळलं. मालिकेच्या कथेतून जेवढा आशय प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवायचा होता तो पोहोचला होता. तेव्हा आपण आता इथेच थांबलं पाहिजे ही जाणीव त्यांना झाली होती. उगाचच मालिकेच्या मूळ कथानकाला फाटा देऊन ती भरकटत नेण्यापेक्षा आणि प्रेक्षकांचाही अंत पाहण्यापेक्षा ही मालिका संपवणे त्यांनी अधिक पसंत केले होते. सुलेखा तळवळकर यांच्या युट्युब चॅनलवरील मुलाखतीसाठी मानसी मागिकर यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. याच मुलाखतीत त्यांनी गोट्या मालिकेबद्दल भरभरून बोलले आहे. मालिकेच्या या खास आठवणी जाग्या केल्याबद्दल प्रेक्षकांनी त्यांचे आभार मानले आहेत.